• Mon. Nov 25th, 2024
    वर्सोवा-दहिसर प्रवास सुस्साट, ४० मिनीटांची बचत होणार, कशी असेल रचना?

    म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारी मार्गाचा (कोस्टल रोड) मरीन ड्राइव्ह ते वरळी हा पहिला टप्पा जवळपास पूर्णत्वास आला आहे. वर्सोवा ते दहीसर या सुमारे १८.४७ किमीच्या ३५ हजार ९५५.०७ कोटींच्या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पाच कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. एकूण सहा पॅकेजमध्ये हे काम चालणार असून या प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे वर्सोवा ते दहिसरमधील प्रवासाच्या वेळेत ३० ते ४० मिनिटांची बचत होईल.

    पश्चिम द्रुतगती महामार्ग, लिंक रोड व एस. व्ही. रोडवरील वाहतूक कोंडी आणि वर्सोवा ते दहिसरमधील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी पालिकेने वर्सोवा व दहिसरला जोडणाऱ्या किनारा रस्त्याच्या बांधकामाचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. कोस्टल रोडच्या वर्सोवा आंतर-बदल ते दहिसर आंतर-बदल अशी या रस्त्याची रचना आहे. सोबत कोस्टल रोडच्या माईंडस्पेस मालाड जंक्शनपासून गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या गोरेगाव पूर्वपर्यंत उन्नत जोडरस्ता प्रस्तावित आहे. यामुळे, मुंबईचे दक्षिण टोक व पश्चिम उपनगरे, मुलुंड व ठाण्याशी जोडली जातील.

    या प्रकल्पाचे काम डिझाइन अँड बिल्ड तत्त्वावर करण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमीत कमी खर्चात आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम करण्याचा प्रयत्न असल्याचे पालिकेने म्हटले आहे. कांदळवने, खाडी यासारख्या विविध भूभागांतून तसेच मेट्रो कारशेडवरून जाणाऱ्या या प्रकल्पाची लांबी जास्त असून त्यात पूल, भुयारी मार्ग असणार आहेत. पुढील चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

    सल्लागार काय काम करणार?
    हा प्रकल्प रस्ता, उड्डाणपूल, भुयारी मार्ग अशा विविध मार्गाने जाणार असल्याने त्यादृष्टीने डिझाईन, संरेखन.
    कांदळवने, खाडी या दरम्यान पर्यावरणाचे नुकसान होऊ नये यासाठी प्रकल्पाची आखणी
    निविदा अटी आणि शर्तीनुसार कामाचे नियोजन
    प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन
    प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्यासाठी कामाचे नियोजन

    ‘या’ टप्प्यांसाठी सल्लागार
    पॅकेज ए : वर्सोवा ते बांगूर नगर, गोरेगाव ४.५ किमी
    कंत्राटदार : ॲप्को इन्फ्राटेक्ट प्रा. लि.
    पॅकेज बी : बांगूर नगर ते माइंडस्पेस, मालाड १.६६ किमी
    कंत्राटदार : जे. कुमार आणि एनसीसी लिमिटेड (संयुक्त)
    पॅकेज सी आणि डी : उत्तर आणि दक्षिणेकडे जाणारा सर्व्हिस रोड, मालाड माइंडस्पेस ते चारकोप कांदिवली ३.६६ किमी
    कंत्राटदार : मेघा इंजिनियरिंग
    पॅकेज ई : चारकोप ते गोराई, ३.७८ किमी
    कंत्राटदार : लार्सन अँड टुब्रो
    पॅकेज एफ : गोराई ते दहिसर ३.६९ किमी
    कंत्राटदार : ॲप्को इन्फ्राटेक्ट प्रा. लि.
    भाईंदर पश्चिम येथील लिंक रोडपासून
    ४५ मीटर रूंद उन्नत मार्गाचे बांधकाम

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed