• Mon. Nov 11th, 2024

    बनावट स्क्रीनशॉटच्या आधारे ‘जिवाची मुंबई’; पुण्यातील तरुणांचा हयातमधील क्लबला साडेनऊ लाखांचा गंडा

    बनावट स्क्रीनशॉटच्या आधारे ‘जिवाची मुंबई’; पुण्यातील तरुणांचा हयातमधील क्लबला साडेनऊ लाखांचा गंडा

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

    पंचतारांकित हॉटेलमधील क्लबमध्ये जाऊन पुण्यातील तेरा-चौदा तरुण-तरुणींनी बनावट स्क्रीनशॉटच्या आधारे ‘जिवाची मुंबई’ केल्याची घटना समोर आली आहे. हॉटेल हयातमधील ‘टॉय रूम क्लब’मध्ये तीन ते चार वेळा येऊन त्यांनी मौजमस्ती केली. विशेष म्हणजे, या उच्चभ्रू टोळीने पैसे भरल्याचे बनावट स्क्रीनशॉट दाखवत क्लबमध्ये अनेकदा प्रवेश मिळवला. फुकट मजा मारणाऱ्या या तरुणांनी या क्लबची सुमारे साडेनऊ लाखांची फसवणूक केली आहे.

    सांताक्रूझ येथील हॉटेल हयातमध्ये ‘टॉय रूम क्लब’ आहे. फोनद्वारे किंवा इंटरनेटच्या माध्यमातून क्लब व्यवस्थापनाद्वारे आगाऊ बुकिंग घेतले जाते. तारीख आणि वेळ निश्चित झाल्यानंतर प्रथम ग्राहकांकडून आगाऊ रक्कम ॲानलाइन स्वीकारली जाते. प्रवेश देताना आगाऊ रक्कम भरल्याची पावती अगर स्क्रीनशॉट पाहिला जातो. आगाऊ रक्कम भरलेली नसल्यास प्रवेश दिला जात नाही. क्लबच्या आर्थिक उलाढाल आणि नफा-तोट्याची पडताळणी दरवर्षी केली जाते. पडताळणी करीत असताना वर्षभरामध्ये झालेले बुकिंग आणि प्रत्यक्षात जमा झालेली रक्कम यामध्ये तफावत आढळली. त्यामुळे बारकाईने सर्व व्यवहार तपासण्यात आले. ज्यांनी ऑनलाइन रक्कम भरून स्क्रीनशॉट दाखवले त्या सर्वांची रक्कम खात्यामध्ये जमा झाली का, याबाबत खात्री करण्यात आली. त्यावेळी सात ते आठ मोबाइल क्रमांकावरून भरलेली सुमारे साडेनऊ लाख रुपये रक्कम खात्यामध्ये जमा झाली नसल्याचे स्पष्ट झाले.

    क्लब व्यवस्थापनाने ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणली. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला असता हे तरुण आणि तरुणी पुणे येथील असल्याचे समजले. या तरुण-तरुणींच्या टोळीने नोव्हेंबर २०१३ पासून तीन ते चारवेळा पैसे भरल्याचे बनावट स्क्रीनशॉट दाखवून क्लबमध्ये मौजमजा केल्याचे आढळले. पहिल्यांदा चोरी न पकडल्याने त्यांनी हे वारंवार केले. पडताळणीमध्ये ही बाब समोर आल्यानंतर क्लब व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी पुण्यातील चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed