अशोक चव्हाण राज्याचे ज्येष्ठ आणि माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या प्रवेशाला गृहमंत्री अमित शाह किंवा भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा उपस्थित राहतील किंवा त्यावेळी शक्तिप्रदर्शन करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र कोणतंही शक्तिप्रदर्शन न करता आज मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं.
दुपारी साडे बाराच्या सुमारास ते भाजप कार्यालयात दाखल झाले. त्यांचं स्वागत करण्यासाठी आशिष शेलार आणि मंत्री गिरीश महाजन पुढे सरसावले. भारतीय जनता पक्षाच्या नावाचा गजर झाला. स्वागत स्वीकारून ते भाजपच्या कार्यालयातील एका खुर्चीवर जाऊन बसले. पुढच्या काही मिनिटांत तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले. त्यांनी अशोक चव्हाण यांच्याशी हस्तांदोलन करून नव्या राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्व नेते मिळून तिथे पक्षप्रवेशाचा सोहळा होणार होता, त्या हॉलमध्ये गेले.
सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं पत्रकारांना सांगितलं. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरला. त्यावर स्वाक्षरी केली आणि तो अर्ज बावनकुळे यांच्या हाती सोपवला. त्यासोबतच सदस्य नोंदणी फी म्हणून त्यांनी ३०० रुपये बावनकुळे यांच्याकडे दिले. घ्या…. “ही पक्षाची फी घ्या..” असं अशोक चव्हाण म्हणाले. त्यावर बावनकुळे आणि फडणवीस यांनीही स्मितहास्य करत फी स्वीकारली.
त्यानंतर अशोक चव्हाण यांच्या गळ्यात भाजपचं उपरणं घालून आणि पुष्चगुच्छ देऊन फडणवीस-बावनकुळेंनी त्यांचं अधिकृतरित्या पक्षात स्वागत केलं. आतापासून भाजपचा नेता म्हणून पक्ष वाढीसाठी मी काम करेन, अशी ग्वाही चव्हाण यांनी सगळ्यांसमोर दिली.