लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केले आहे. वजनदार नेत्यांच्या हातात कमळ देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातील काही नेते त्यांच्या गळाला लागण्याची चिन्हे आहेत. सध्या कोल्हापूर, हातकणंगले, सांगली आणि सोलापूर या चारही लोकसभा मतदार संघात महायुती आणि त्यांच्या संभाव्य उमेदवाराविरोधी वातावरण आहे. त्यामुळेच काहीही करून या जागा पदरात पाडून घेण्यासाठी इनकमिंगचा नारा भाजपने दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील आमदार विश्वजित कदम, सतेज पाटील, प्रणिती शिंदे, राजू आवळे यांच्यासह काही नेत्यांची नावे भाजप प्रवेशाच्या यादीत असल्याची चर्चा आहे. या सर्वांनी तातडीने पत्रकार बैठक घेऊन भाजप प्रवेशाचा इन्कार केला आहे. सतेज पाटील यांनी काँग्रेसची भूमिका भक्कम ठेवल्याने पाच आमदार त्यांच्यासोबत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे सहा आमदार आहेत. त्यामुळे पक्षाची मोठी ताकद आहे. हीच ताकद कमी करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. पण याला सतेज पाटील यांनी ब्रेक लावला आहे.
लोकसभेला काँग्रेसला जास्त जागा मिळतील असा सर्व्हे आला, त्यामुळे कुठतरी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा मूड महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. दुसऱ्या फळीतील आम्ही कार्यकर्ते एकसंघ राहून काँग्रेसचा हा झेंडा समर्थपणे पुढे घेऊन जाणार आहोत.
आमदार सतेज पाटील, उपनेते, विधान परिषद, काँग्रेस
पश्चिम महाराष्ट्रात चार मतदार संघात जी सध्या भाजपची परिस्थिती आहे, ती सुधारण्यासाठी आणि काही ठिकाणी थेट उमेदवारीच गळ्यात घालण्यासाठी काही नेत्यांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. कदम यांचीही सांगली जिल्ह्यात मोठी ताकद आहे. त्यांना भाजपमध्ये घेतल्यास लोकसभेत कमळ फुलण्यास मदत होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या पाच पैकी एक किंवा दोन खासदाराची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे. तसे करूनही अपयश येण्याची भीती भाजपला वाटत असल्यानेच काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. या भागातील काही नेत्यांना थेट भाजप प्रवेश मान्य नाही, त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय देण्यात आला आहे. तेथे प्रवेश करत महायुती बळकट करण्याचा शब्द देण्यात आल्याची चर्चा आहे. यामुळे येत्या चार दिवसात पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या राजकीय हालचाली होण्याची चिन्हे आहेत.