• Sun. Mar 15th, 2026
    छत्रपती संभाजीनगर विभागात पाणीटंचाई तीव्र; अकरा दिवसांत आणखी १६ गावे तहानली, वाढीव २२ टँकर सुरु

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : उन्हाचे चटके जाणूव लागलेले असतानाच दुसरीकडे पाणी टंचाईची तीव्रताही वाढू लागली आहे. गेल्या ११ दिवसांतच तहानलेल्या गावाची संख्येत आणखीन १६ गावांची भर पडली. परिणामी, पाणीपुरवठ्यासाठी आणखीन २२ टँकर सुरू करावे लागले.

    सन २०२२मध्ये मराठवाड्यात दमदार पाऊस झाला. परिणामी, गेल्या उन्हाळ्यात मार्च, एप्रिलपर्यंत टँकरची मागणी झाली नव्हती; पण त्यानंतर उन्हाचा पारा वाढल्यानंतर पाण्याचे कायमस्वरूपी स्रोत नसलेल्या भागांतून टँकरची मागणी सुरू झाली. प्रारंभी काही गावांत थोड्याबहुत प्रमाणात टँकर सुरू होते. जून महिन्यानंतर टँकरच्या संख्येत घट होईल, असे मानले जात होते; परंतु जून महिना पावसाअभावी कोरडाच गेला. त्यानंतर पडलेल्या पावसामुळे नांदेड, हिंगोलीसह अन्य काही जिल्हे टँकरमुक्त झाले; परंतु विभागात सर्वदूर दमदार पाऊस न झाल्याने तहानलेल्या गावांना टँकरशिवाय पर्याय राहिला नाही.

    दरम्यान, काही दिवसांपासून दुपारी उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. दुसरीकडे तहानलेल्या गावांच्या संख्येतही भर पडत असल्याचे चित्र आहे. ११ दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांतील एकूण १७६ गावे, ४२ वाड्यांना मिळून २५५ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू होता. सध्या या तीन जिल्ह्यांतील एकूण तहानलेल्या १८९ गावे, ४५ वाड्याना २७७ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. विभागातील अन्य जिल्हे टँकरमुक्त असले, तरी सध्याची टँकरची मागणी पाहता उन्हाचा तडाखा वाढल्यावर पाण्याचे आणखी दुर्भिक्ष निर्माण होण्याची भीती आहे.

    ३६५ विहिरींचे अधिग्रहण :

    संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता लातूर व हिंगोली वगळता विभागातील उर्वरित जिल्ह्यांतील खासगी विहिरी अधिग्रहित केल्या आहे. ८ फेब्रुवारीच्या अहवालानूसार ३६५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०२, जालना १०२, परभणी ५२, नांदेड २, बीड १४ आणि धाराशिव जिल्ह्यात ५५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यात टँकरसाठी १३१ गावातील १४७ विहिरीचे तर टँकर व्यतिरिक्त १७५ गावातील २१८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
    मराठवाड्यातील भीषण वास्तव! महिन्यात ८२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक घटना
    टँकरद्वारे पाणी पुरवठा –
    जिल्हा – गावे – वाड्या – टँकर संख्या
    छत्रपती संभाजीनगर – १२४ – १६ – १५३
    जालना – ६४ – २६ -१२४
    बीड – १ – ३ – १
    एकूण – १८९ – ४५ – २७८

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *