• Wed. Jul 22nd, 2026

    कायम विना अनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनासाठी पुढाकार घ्यावा – मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 22, 2026
    कायम विना अनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनासाठी पुढाकार घ्यावा – मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. २२ जुलै : राज्यातील कायम विना अनुदानित महाविद्यालयांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने नॅक मूल्यांकनास प्राधान्य द्यावे, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अपार आयडी, एबीसी आयडी नोंदणी आणि इंटर्नशिप उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांनी केले.

    राज्यातील कायम विना अनुदानित महाविद्यालयांच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित होते. बैठकीस महाराष्ट्र राज्य विना अनुदानित महाविद्यालय संघाच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून विविध प्रश्न मांडले.

    बैठकीत राज्यातील एकूण ३,८२९ महाविद्यालयांपैकी २,५९८ विना अनुदानित आणि १,२३१ अनुदानित महाविद्यालये असल्याची माहिती देण्यात आली. ग्रामीण भागातील महाविद्यालयांना पीएच.डी./नेट/सेट अर्हताधारक शिक्षकांची उपलब्धता, विद्यापीठांना भरावे लागणारे वार्षिक संलग्नीकरण शुल्क, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत न मिळणे, तसेच त्यामुळे महाविद्यालयांवर येणारा आर्थिक ताण आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

    उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी सांगितले की, या सर्व विषयांवर २४ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए), पुणे येथे आयोजित राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरू व प्र-कुलगुरू यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून आवश्यक निर्णय घेतले जातील.

    विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये नॅक मूल्यांकनाचे प्रमाण समाधानकारक नसल्याबद्दल चिंता व्यक्त करत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि राष्ट्रीय स्तरावर अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व महाविद्यालयांनी तातडीने मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तिसऱ्या वर्षातील अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपच्या संधी वाढविणे, तसेच प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याचे अपार आयडी आणि एबीसी आयडी तयार करण्यासाठी महाविद्यालयांनी विशेष मोहीम राबवावी, असे आवाहनही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

    बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    0000

    काशीबाई थोरात/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed