• Wed. Sep 9th, 2026

आषाढी एकादशीनिमित्त ‘सावळ्या विठ्ठला’च्या भक्तिरंगात रंगणार पुणे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 22, 2026
आषाढी एकादशीनिमित्त ‘सावळ्या विठ्ठला’च्या भक्तिरंगात रंगणार पुणे – महासंवाद

  • संगीतअभंग आणि भक्तिगीतांच्या सुरेल सादरीकरणातून विठ्ठलभक्तीचा अनुभव

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्राच्या समृद्ध भक्तीपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या सांस्कृतिक वारशाचा जागर घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सावळ्या विठ्ठला’ या विशेष कार्यक्रमातून विठ्ठलाच्या भक्तिरंगात रसिकांना चिंब करणारी संगीतमय वारी अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम रविवार,  २६ जुलै २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता भरत नाट्य मंदिर, पुणे येथे होणार आहे.

आषाढी एकादशी हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह संतपरंपरेने विठ्ठलभक्ती, नामस्मरण, अभंग आणि कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकजीवनाला समृद्ध केले आहे. पंढरपूरच्या वारीची ही समृद्ध परंपरा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक आहे. याच भक्तीपरंपरेचा सांगीतिक आविष्कार ‘सावळ्या विठ्ठला’ या कार्यक्रमातून सादर करण्यात येणार आहे.

या विशेष कार्यक्रमाची संकल्पना व संगीत संयोजन संगीतकार आनंदी विकास यांचे असून, संवाद लेखन व सादरीकरण नीरजा आपटे आणि आनंदी विकास यांचे आहे. साईप्रसाद, शेफाली कुलकर्णी, रसिका जोशी आणि सागर जाधव हे गायक आपल्या सुरेल सादरीकरणातून विठ्ठलभक्तीचा भाव जागविणार आहेत. अभंग, भक्तिगीते आणि भक्तिरसपूर्ण सांगीतिक रचनांच्या माध्यमातून रसिकांना पंढरीच्या वारीचा आणि विठ्ठलनामाच्या गजराचा अनुभव घेता येणार आहे.

या कार्यक्रमासाठी अपूर्व द्रवीड (तबला), अक्षय शेवडे (पखवाज), आनंद टाकळकर (साईड रिदम), विकास देशमुख (मंजिरी), मंदार गोडसे (संवादिनी), धवल जोशी (बासरी) आणि तुषार दीक्षित (की-बोर्ड) हे वादक कलावंत साथसंगत करणार आहेत.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याबरोबरच संतपरंपरा, मराठी संगीत आणि आधुनिक सांगीतिक अभिव्यक्ती यांचा परिचय अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे.

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे, अभिजात कला, लोककला आणि थोर कलावंतांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘सावळ्या विठ्ठला’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचा रसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed