काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल बैस यांची राजभवनात भेट घेतली. त्यावेळी निवेदनाद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. या शिष्टमंडळात पटोले यांच्यासह काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वीही राज्यपाल महोदयांना भेटून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आम्ही अवगत केले होते. त्यानंतर राज्यपाल महोदयांनी पोलिस महासंचालकांना बोलावून आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. परंतु आता नवीन पोलिस महासंचालक आले आहेत आणि कायदा सुव्यवस्था आणखी ढासळली आहे. नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कमी झाल्याचे खुद्द पोलिस महासंचालक यांनीच मान्य केले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘निर्भय बनो’च्या सभांना संरक्षण द्यावे
शाहू, फुले, आंबेडकरांच्या राज्यात गुन्हेगारांना सरकारी संरक्षण मिळत आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण चालले आहे, याची माहिती राज्यपालांना आम्ही दिली. तसेच ‘निर्भय बनो’च्या सभांना संरक्षण दिले पाहिजे, निखिल वागळे, असिम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.