मिळालेल्या माहितीनुसार, सेलू तालुक्यातील राजवाडी येथील राहणारे प्रताप शेवाळे या २७ वर्षीय युवक आज सकाळी आपल्या शेताच्या शेजारील असलेल्या बांधवांचा डब्बा देण्यासाठी म्हणून शेताकडे निघाला. पण ते शेजाऱ्याच्या शेतात गेलाच नाही तर आपल्या शेतात जाऊन शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आज अकरा वाजेच्या दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांना झाडाला कोणीतरी गळफास लावल्याचे आढळून आले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
प्रताप शेवाळे या युवकाचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून तो शेती हा व्यवसाय करत होता. प्रतापला मराठा आरक्षण लवकरात लवकर लागू व्हावे, अशी मनापासून इच्छा होती. सेलू येथे मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी जी आंदोलने झाली त्यामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. अंतरवाली सराटी येथे देखील मनोज जरांगेच्या सभेला तो आवर्जून उपस्थित होता. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जालना ते मुंबई पायी प्रवासात देखील आपल्या गावकऱ्यांसह सक्रिय सहभाग होता. एवढे करूनही अद्यापही सगळे सोयरेचा कायदा सरकारने पारित केला नाही. मराठा आरक्षणाला वेळ होत आहे. त्यामुळे प्रतापने हे टोकाचे पाऊल उचलले. चिठ्ठीमध्ये ”एक मराठा, लाख मराठा”,असं लिहित आपली जीवनयात्रा संपवणाऱ्या प्रतापसाठी परभणी जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.