गेल्या काही महिन्यांपासून बोराडे हे बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सत्तारुढ महायुतीतील घटक पक्ष असणार्या राष्ट्रवादीच्या अजित दादा पवार गटाच्या संपर्कात होते. विशेषतः एक-दोन बैठकीतून बोराडे यांनी दादांबरोबर हितगूजही केले. त्यानंतर समर्थकांबरोबर चर्चा करीत आगामी निवडणूका, त्याअनुषंगाने समीकरणे ओळखून दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा जवळपास निर्णयही केला होता. त्यापाठोपाठ ते अजित दादांच्या भेटीच्या प्रतिक्षेत होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बोराडे व समर्थकांना मुंबईत वेळ दिला होता. त्या भेटीतच बोराडे व समर्थकांचा राष्ट्रवादीच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल, अशी स्पष्ट चिन्हे होती.
माजी नगराध्यक्ष बोराडे हे समर्थकांसह मंगळवारी रात्री ताफ्यानिशी मुंबईस रवाना झाले अन् आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी भवनात उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या समवेत माजी उपाध्यक्ष प्रभाकर सुरवसे, साईराज बोरडे, माजी नगरसेवक मारोती चव्हाण, रमेश दौंड, सचिन कोरडे, सतीश जाधव, गौतम धापसे, वहिद अन्सारी, मिलींद सावंत, बालू झमकडे, शेख काशीम, शेख अय्युब, बबन गायकवाड, शेख अन्वर, व्यंकट चव्हाण, लक्ष्मण बुरेवार, राजेंद्र झोडगांवकर, बालासाहेब सरकाळे आदींनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.
