• Mon. Nov 25th, 2024
    राष्ट्रवादी कधीच एका कुटुंबाचा पक्ष नव्हता; जयंत पाटील यांचा दावा

    अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली असली तरी हा पक्ष एका कुटुंबाचा कधीच नव्हता. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद कधीच पवार यांच्या कुटुंबातील सदस्याकडे नव्हते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

    पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे पाटील यांचा आज अहमदनगर लोकसभा मदतदारसंघ आढावा दौरा होता. सकाळी कर्जत-जामखेड मतदारसंघातील आढावा आणि मेळावा घेतल्यानंतर उरलेल्या भागाचा आढावा घेण्यासाठी पाटील नगर शहरात आले. येथे पक्षाचे जुने सहकारी आणि पवार कुटुबियांचे नीकटवर्तीय ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांच्या निवासस्थानी पाटील दाखल झाले. मधल्या काळात कळमकर दुरावले होते. कळमकर यांचे पुतणे माजी महापौर अभिषेक कळमकर शिवसेनेत गेले होते. मात्र, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कळकमक काका-पुतणे पुन्हा पवार यांच्यासोबत आले. आज पाटील यांनी थेट कळमकर यांच्या घरी जात शहरातील कार्यकर्त्यांना संदेश देण्याचा प्रयत्न केला.

    कळमकर यांच्या निवासस्थानीच पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कालच केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेससंबंधी निर्णय दिला आहे. या दरम्यान पक्षावर घराणेशाहीचा आरोप झाला होता. यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका कुटुंबाचा पक्ष कधीच नव्हता. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद सतत राज्यातील विविध भागातील नेत्यांकडे होते. पक्षासंबंधी युक्तिवाद करताना अगर नियम पाळताना आमची कोठेच चूक झालेली नाही. आयोगाचा निर्णयच चुकीचा आहे, या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असेही पाटील म्हणाले.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पाटील यांनी कडाडून टीका केली. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्रांचे गुंडांसोबतची छायाचित्रे समोर येणे अत्यंत गंभीर आहे. गुंडगिरी करणारे राजकारणात आले आहेत आणि राजकारणातील लोक गुंडांच्या मदतीने आपल्या साम्राज्याचे विस्तार करताना दिसत आहेत, अशा दोन गोष्टी सध्या महाराष्ट्रात पहायला मिळत आहेत. महाराष्ट्र अधोगतीकडे नेणारे हे उदाहरण असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

    यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी महापौर अभिषेक कळमकर, संदीप वर्पे, मेहबूब शेख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि शरद पवार यांचे जुने कार्यकर्ते उपस्थित होते.

    स्वागताचे फलक लावले आणि काढलेही…

    पाटील यांचा हा पूर्वनियोजित दौरा होता. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी कालपासूनच नगर शहरात फलक लावण्यात आले होते. माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी हे फलक लावले होते. निवडणूक आयोगाचा निकाल येण्यापूर्वी हे फलक लावले असल्याने त्यावर राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्ह होते. होते. मात्र, निकालानंतर ते काढण्यात आल्याचे आढळून आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ते काढल्याचा आरोप होत आहे. एवढेच नव्हे तर पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. यासंबंधी विचारले असता पाटील यांनी एका वाक्यात उत्तर दिले. पाटील म्हणाले, “मी नगर शहरात आलोय, हे त्यांना कळले आहे. त्यांच्यासाठी हेच खूप झाले”.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *