रत्नागिरी येथे आयोजित औद्योगिक महामंडळाच्या क्रीडा स्पर्धांच्या कार्यक्रमात आज किरण सामंत यांनी केलेले वक्तव्य हे सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरलं आहे. ते म्हणाले की, मुख्य कार्यकारी अभियंता बिपिन शर्मा यांना मी सांगू इच्छितो, कारण उदय आज मंत्री आहे, उद्या नसेल. माहिती नाही कोणीही ताम्रपट घेऊन आलेले नाही. पण मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून सांगतो की, या तुमच्या तीन दिवसांच्या स्पर्धांमध्ये इतर खेळांनाही समाविष्ट करून घ्या अशीही सूचना किरण सामंत यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, २०१८ पासून मी आणि उदय नियमित धावण्याचा सराव करत होतो. आता तुम्ही ज्या वेळेला मैदानावर शपथ घेत होतात त्यावेळेला मीही माझ्या मनात ठरवलं की आता आपण उद्यापासून धावायचं, असं किरण सामंत यांनी म्हटलं आहे. २०१८ पर्यंत पूर्वी उदय आणि मी आम्ही दोघेही ४५ मिनिटं दररोज न चुकता व्यायाम करायचो. पण नंतर उदयनेही व्यायाम बंद केल्यानंतर मीही बंद करून टाकलं. माझं वजन त्यावेळी ७८ किलो होतं. आज ९८ किलो झालं आहे. पण आज शपथ घेताना मी ही मनातल्या मनात शपथ घेतली की आता उद्यापासून धावायला सुरुवात करायची. यापूर्वी मी नेहमीच व्यायाम करत असून माझं शारीरिक तंदुरुस्त फिट ठेवत असे.
किरण सामंत म्हणाले की, माझ्या स्टाफची ही आरोग्य तपासणी दर सहा महिन्याने एक जानेवारी आणि एक जून रोजी शारीरिक तपासणी करून घेऊन त्यांची चेकअप ही करत असे. उदयने व्यायाम करायचा सोडला म्हणून मी सोडला. पण मी आज सांगतो आज मी शपथ घेतली की मी उद्यापासून धावायला सुरुवात करणार, असाही पुनरुच्चार किरण सामंत यांनी बोलताना केला आहे. बंद केलेला हा व्यायाम प्रकार पुन्हा सुरू करणार असल्याचे सुद्धा किरण सामंत यांनी सांगितले. कारण शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
आजच्या किरण सामंत यांच्या भाषणाने राजकारण ढवळून निघालं आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून किरण सामंत यांच्या या वक्तव्याचे विविध अर्थ आता लावले जात आहेत. यापुढे मंत्री उदय सामंत बरोबर असो वा नसो पण किरण सामंत आता एकट्याने पुढे जाणार, अशा स्वरूपाचे हे सुतोवाच असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान किरण सामंत याच्या आजच्या या भाषणाने पुन्हा एकदा कोकणच्या राजकारणात ही राजकीय भूकंपाची तर नांदी नाही ना? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.