• Sat. Sep 21st, 2024
उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर सडकून टीका, म्हणाले, सीतारामन यांचं धाडस म्हटलं पाहिजे की…

रायगड : आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या रायगड जिल्हा दौऱ्यावरती आले आहेत. यावेळी त्यांनी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर टीका करताना, निर्मला सीतारामन यांनी जड अंत:करणाने मांडलेला हा शेवटचा अर्थसंकल्प असून त्यांनी धाडस केल्याने मी त्यांचं कौतुक करतो, अशी उपरोधिक टिप्पणीही केली. पेण येथील आयोजित सभेत ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, आपण पेण दौऱ्यावरती येत असताना मोबाईलवरती आलेल्या अर्थसंकल्पाच्या हायलाइट्स पाहिल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी आणखी एका गोष्टीसाठी अभिनंदन करतो सीतारामन बाई असं म्हणाल्या की आता यापुढे आम्ही या देशात चार जातींसाठी काम करणार आहोत. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी… मी त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी मोठं धाडस केलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समोर बसलेले असताना त्यांनी मोदींसमोर बोलण्याचं धाडस दाखवलं.

निवडणुका आल्यानंतर का होईना पण पंतप्रधानांना त्यांनी सांगितलं की हा देश म्हणजे तुमच्या आजूबाजूचे सुटाबुटात बसलेले मंत्री आहेत, मित्र आहेत ते नाहीयेत तर तुमच्या पलीकडे सुद्धा हा देश आहे. त्याच्यामध्ये तरुण आहेत, शेतकरी आहेत, महिला आहेत, व गरीब सुद्धा आहेत. दहा वर्षे झाली, आता दहा वर्षानंतर तुम्हाला या चार जाती आठवल्या का? असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

तुमच्यासोबतच अदानी वगैरे आहेत, तेवढा देश नाहीये की ज्याच्यासाठी तुम्ही देशाची दहा वर्षे खर्ची घातली. हे सुटाबुटातलं सरकार आता गरिबांकडे लक्ष द्यायला आलेलं आहे. निर्मला सीतारामन म्हणाल्या, सरकार महिलांचा सन्मान करतंय, तर मग तुम्ही मणिपूरमध्ये का जात नाही? असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी या सभेत उपस्थित केला. मणिपूरमध्ये जाऊन त्या महिलांवरती अत्याचार झाले आहेत, त्यांना जाऊन सांगा की अहो आम्हाला माहितीच नव्हतं की आमच्या देशात महिला आहेत. आत्ता आम्हाला कळलं की निवडणुकीमध्ये महिलांची मतं पाहिजेत म्हणून आम्ही सांगतो आहोत की आम्ही आता महिलांसाठी काम करणार आहोत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावरही केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed