बारामती अॅग्रो कारखान्यात झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. सूडबुद्धीने केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याची भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली. गेल्याच आठवड्यात २४ जानेवारीला तब्बल ११ तास रोहित यांची चौकशी झाली. आज बुधवारी पुन्हा एकदा रोहित पवार यांना ईडीकडून आवतान धाडण्यात आलं आहे. सकाळीच रोहित पवार ईडीच्या कार्यालयात गेले आहेत. त्याचवेळी प्रतिभाकाकी आणि रेवती सुळे मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात आलेल्या आहेत.
शरद पवार यांचा कित्ता प्रतिभाकाकींना गिरवला
मागील आठवड्यात नातवाला ईडीचं निमंत्रण आल्यानंतर शरद पवार यांनी टॉप गिअर टाकत कार्यकर्त्यांमध्ये जान भरली. रोहित पवार सकाळी ईडी ऑफिसला पोहोचले तेव्हाच शरद पवार देखील पक्ष कार्यालयात आले. चौकश्यांनी चिंतित असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, कार्यकर्त्यांशी गप्पा मारल्या. संसदीय राजकारणातील ५० वर्षाचे अनुभव कथन करताना आलेले चांगले वाईट प्रसंग शेअर केले. जोपर्यंत रोहित पवार कार्यालयात ईडी चौकशीसाठी होते, तोपर्यंत शरद पवार देखील शेजारीच असलेल्या पक्ष कार्यालयात तळ ठोकून होते. आज तोच कित्ता प्रतिभा पवार यांनी गिरवला.
बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास प्रतिभा पवार आणि रेवती सुळे या ईडी कार्यालयाच्या शेजारीच असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात आल्या. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली तसेच रोहित पवार यांचाही नावाचा जयजयकार केला. प्रतिभाकाकींनी कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारत आणि खचाखच भरलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीतून वाट काढत राष्ट्रवादीच्या कार्यालयात पाऊल ठेवलं.