• Sat. Sep 21st, 2024
नरेंद्र मोदी ११ फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर; जिल्हा प्रशासनाकडून दौऱ्याचा आढावा

यवतमाळ: आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर देशात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाने जोरदार रणनिती आखली आहे. २०१४ च्या निवडणूकीपुर्वी पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे येऊन ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाआधारे निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते. आता पुन्हा काही पक्षीय कार्यक्रमाच्या पार्श्‍वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ११ फेब्रुवारीला जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. त्यांच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्‍वभुमीवर जिल्हा प्रशासनात हालचाली वाढल्या असून आज जानेवारीला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यंत्रणानिहाय आढावा घेण्यात आला.

लोकसभा निवडणूकी २०२४ ची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. देशात २०१९ च्या निवडणूकीमध्ये भाजपाने ३०३ खासदार निवडून आणून एक मजबूत सरकार स्थापन केले. २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांच्या नियोजनातून देशात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहे. अलिकडेच अयोध्येत प्रभु रामचंद्रांच्या मंदिराचे लोकार्पण व रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करून एक वातावरण देशात उभे केले. आगामी २०२४ च्या निवडणूकीत पक्षाचे सर्वाधिक खासदार निवडून आणण्याचे नियोजन भाजपच्या नेतृत्त्वाने केले आहे.
एपीएमसी बाजारात आंब्याची विक्रमी आवक; ३६० पेट्या बाजारात दाखल, जाणून घ्या दर
यवतमाळ हा जिल्हा नेहमीच देशाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. त्या पार्श्‍वभुमीवरच ११ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा कार्यक्रम जवळपास निश्‍चित झाला आहे. यवतमाळमध्ये भव्यदिव्य महिला बचत गटांचा मेळावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी येथीलही विकासकामांचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्या पार्श्‍वभुमीवर आज २९ जानेवारीला पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या दृष्टीने काही नियोजन केले. प्रामुख्याने यंत्रणानिहाय अधिकाऱ्यांवर धुराही सोपविण्यात आल्या आहे.

काय आहे कार्यक्रमाचे नियोजन?
जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ फेब्रुवारीच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभुमीवर राजशिष्टाचार आणि सुरक्षा वर्गवारी पाळली जावी, या दृष्टीने सर्वच विभाग प्रमुखांवर कामे सोपविली आहे. पोलीस अधीक्षकांना चोख बंदोबस्त ठेवायचा आहे. बुलेटप्रुफ वाहनाची उपलब्धता, कॅनव्हायकरीता लागणारी वाहने आणि इतर अधिग्रहित वाहने जमा करण्याचे निर्देश दिले आहे. बंदोबस्त कामी लावलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा पासेसची व्यवस्था करावी लागणार आहे. यवतमाळ एसडीओ आणि तहसीलदारांवरही विश्राम गृहासह इतर बाबीची धुरा दिली आहे.

अजित पवारांच्या बारामतीत जनता दरबार; नागरिकांची मोठी गर्दी

वणी एसडीओंसह वणी व झरी तहसीलदारांवर विमानतळ, हेलीपॅड येथील आगमन व प्रस्थान समयीची व्यवस्था सोपविली आहे. आरटीओंना जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कॅनव्हायसाठी अधिग्रहित केलेल्या वाहनांची धुरा सोपविण्यात आली आहे. त्यांना सर्व वाहनांची बारकाईने तपासणी करावी लागणार आहे. बांधकाम विभागाला हेलीपॅड तयार करण्याची धुरा असून दौऱ्याच्या मार्गावरील बॅरीगेटींग मंडप व स्टेजची तपासणी, तसेच पायलटसाठी व्हिआयपी कक्ष आरक्षीत ठेवावे लागणार आहे.

महावितरणला कार्यक्रमाच्या दिवशी अखंडित वीजपुरवठा ठेवावा लागणार आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधीक्षकांना दोन वैद्यकीय पथके रूग्णवाहिकेसह तसेच रक्तगटाच्या पुरवठ्यासह सर्व व्यवस्था ठेवायची आहे. तज्ज्ञ डॉक्टर, रुग्णवाहिका, रक्तपेढी, मनुष्यबळ उपलब्ध ठेवायचे आहे. उत्पादन शुल्क विभागाकडे पायलटची व्यवस्था दिली आहे. पालिका प्रशासनाकडे अग्निशमनदल व्यवस्था करणे तसेच जिल्हा महिती अधिकाऱ्यांकडे दौरा कार्यक्रम आणि प्रसिद्धी माध्यमांची धुरा सोपविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed