अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. संमेलानाचा उत्साह संपूर्ण अमळनेर शहरात दिसून येत आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर प्रताप महाविद्यालय परिसरात रंगरंगोटी, सुशोभिकरणासह जय्यत तयारी सुरु आहे. मंडप उभारणी, प्रवेशद्वारासह इतर कामे पुर्णत्वाकडे आली आहेत. प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर सुमारे सात ते दहा हजार प्रेक्षक बसतील, अशा ‘जर्मन हँगर’ पद्धतीचा भव्य असा सभामंडप उभारण्यात येत आहे. यामध्ये सुमारे १५० बाय ३२५ फूट अशा भव्य मंडप उभारण्याच्या कामाला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे.
संमेलनस्थळी प्रवेश करण्यासाठी महाविद्यालयासमोर भव्य व आकर्षक प्रवेशव्दार उभारण्यात आले आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज, संत सखाराम महाराज, पूज्य साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी, श्रीमंत प्रताप शेटजी यांच्या प्रतिमा आहेत. याशिवाय संपूर्ण महाविद्यालय परिसरातील भिंतींवर आकर्षक चित्रे काढण्यात आली आहे. पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत उभारण्यात आलेल्या सभामंडप क्र. १ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात ७ ते १० हजार लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या मंडपात ८० बाय ५० फूटांचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. त्याची जमिनीपासूनची उंची ६ फूट आहे. हे सभामंडप जर्मन हँगर पद्धतीने उभारण्यात आले आहे. हे संपूर्ण सभामंडप वॉटरप्रूफ आहे. विशेष बाब म्हणजे, इतक्या मोठ्या मंडपात एकही खांब नाही.
सभामंडप क्र. २ कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात अंदाजे ५०० जणांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सभामंडप क्र. ३ बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहातही अंदाजे ५०० जणांची बैठक व्यवस्था असेल. हे संभामंडप प्रताप महाविद्यालयातील जुन्या नाट्यगृहात आहे. बी. फार्मसी महाविद्यालयाजवळ ३०० ग्रंथदालने उभारण्यात आली आहे. यात खवय्यांसाठी काही दालने राखीव ठेवण्यात आली आहे. याच परिसरात प्रकाशन कट्टा व सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आले आहे.
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांना आज २९ पासून सुरुवात झाली. आर्या शेंदुर्णीकर हिच्या कथ्थक नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तिने माझी माय सरस्वती, अग नाच नाच राधे, अवघे गरजे पंढरपूर या गाण्यावर आपल्या बहारदार नृत्याने सर्वांची मने जिंकली. नंतर सुनील वाघ व सहकारी यांनी मराठी पाऊल पडते पुढे हा बहारदार संगीत गायन कार्यक्रम सादर केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, पूज्य साने गुरुजी व प्रताप शेठजी यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. व्यासपीठावर माजी विधान परिषद सदस्या स्मिता वाघ, अमळनेरच्या माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील, साहित्य संमेलनाचे समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र पाठक, कार्याध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण कोचर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना जयश्री पाटील म्हणाल्या की, अमळनेरला मराठी साहित्य संमेलन व कॅबिनेट मंत्रीपद मिळाले या आनंददायी घटना घडल्या आहेत. तर या कार्यक्रमाचे उद्घाटन आमच्या हातून होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे स्मिता वाघ म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वसुंधरा लांडगे यांनी केले. डॉ. अमोघ जोशी यांनी आजच्या दिवसाची सर्व जबाबदारी सांभाळली. सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
या कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला
आर्या शेंदूर्णीकर (कथ्थक), बहारदार संगीत व गीत गायन सुनील बळवंत वाघ, अनिल दत्तात्रय वैद्य, उज्वल शंकर पाटील, शिवानी सुनील वाघ, सुरश्री अनिल वैद्य, विजय गोविंद शुक्ल, मंगेश प्रभाकर गुरव, रूपक अनिल वैद्य, गिरीश दत्तात्रेय चौक, नितिन उत्तमराव गुरव, राऊफ शेख यांनी केले.