सांताक्रूझ येथे सोमवारपेक्षा २.३ अंशांनी तर कुलाबा येथे ०.९ अंशांनी किमान तापमान घसरले. सांताक्रूझ येथील तापमान सरासरीपेक्षा २ अंशांनी कमी नोंदले गेले. यापूर्वी जानेवारीमध्ये सांताक्रूझ येथे गेल्या दहा वर्षांमध्ये किमान तापमान ११.४ अंशांपर्यंतही खाली उतरले होते. गेल्या वर्षी जानेवारीत सांताक्रूझ येथे सर्वांत किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअस होते. तर २०२०मध्ये ते ११.४ अंशांपर्यंत खाली उतरले होते. कुलाबा येथे गेल्या १० वर्षांमध्ये जानेवारीत सर्वांत कमी किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. गेल्या वर्षी जानेवारीत कुलाबा येथे १६.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. मंगळवारी मुंबईच्या वनक्षेत्राच्या परिसरातील बोरिवली, कांदिवली, मालाड, पवई, मुलुंड अशा परिसरामध्ये गारठ्याची जाणीव उर्वरीत मुंबईच्या तुलनेत अधिक होती.
मुंबईत कमाल तापमानाचा पाराही मंगळवारी सोमावरपेक्षा कमी नोंदला गेला. सांताक्रूझ येथे ३० तर कुलाबा येथे २८.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. हे तापमान सोमवारपेक्षा अनुक्रमे १.१ आणि २ अंशांनी कमी होते. बुधवारीही किमान तापमान १७ अंशांहून कमी असेल, असा अंदाज आहे. ‘सध्या उत्तरेकडून येणारे वारे अधिक शक्तिशाली असल्याने किमान तापमान खाली उतरले’, असे प्रादेशिक हवामान विभाग अधिकारी सुनील कांबळे यांनी सांगितले. मात्र हा पारा गुरुवारपासून पुन्हा वर चढू शकतो. शुक्रवारी २६ जानेवारी रोजी किमान तापमान पुन्हा एकदा २० अंशांच्या पुढे जाऊ शकेल, तसेच कमाल तापमानाचा पाराही ३५ अंशांपर्यंत चढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बहुतांश जिल्ह्यांमध्येही थंडी
मंगळवारी मुंबईतच नव्हे, तर अलिबाग येथे १३.७, डहाणू येथे १५.३, रत्नागिरी येथे १७.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. मध्य महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये १५ अंशांहून कमी किमान तापमान होते. जळगाव येथे ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. तर नाशिक येथे १०.१ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. मराठवाड्यात धाराशीव येथेही १०.३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. या तुलनेत विदर्भातील मात्र किमान तापमान सध्या सरासरीपेक्षा मोठ्या फरकाने अधिक आहे. वातावरणात आर्द्रताही विदर्भात अधिक आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News