• Mon. Nov 25th, 2024
    बारामतीत अनोखा प्रयोग! आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानातून भाज्यांची लागवड; वाचा सविस्तर

    पुणे: गेल्या काही महिन्यांपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात धुमाकूळ घालताना दिसतो आहे. विशेषत: डिपफेक व्हिडिओच्या माध्यमातून तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स गवगवा आणखीच वाढला. या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वावर हा मनोरंजन क्षेत्रातच होईल, असं वाटत असतानाच आता आलेली बातमी अतिशय महत्त्वाची आहे.

    भारतात पहिल्यांदाच बारामतीमध्ये उसासह भेंडी, टोमॅटो, मिरची, टरबूज, भोपळा, फ्लॉवर, कोबी अशी पिके आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर पिकवण्यात आली आहेत. त्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. जगामध्ये भारतात पहिल्यांदाच बारामतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शेतीमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक पिकांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे नियोजन करण्यात आले आहे. ते पीक व्यवस्थापन हे केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केले जात आहे. त्याचा परिणाम ही चांगला मिळू लागला असून ऐन थंडीत न येणारी भेंडीसारखी पिके उत्तम स्थितीत सध्या तरारली आहेत.
    कोकणच्या विकासासाठी कोकण प्रादेशिक पक्षाची घोषणा; नोंदणीसाठी भारतीय निवडणूक आयोगाकडे अर्ज
    या संदर्भात कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ तुषार जाधव यांनी माहिती दिली की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर पहिल्यांदाच विविध पिकांमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स असून यामध्ये जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश मोजणारी यंत्रणा, हवेतील तापमान, हवेचा वेग आणि हवेतील आर्द्रता मोजण्याबरोबरच हवेतील रोगराईचे सुद्धा सूक्ष्म निरीक्षण करणारी सेन्सर्स यामध्ये आहेत. याचबरोबर पाण्याची मोजमाप करणारी, जमिनीची क्षारता तपासणारी आणि जमिनीतील पिकांवर परिणाम करणारी इलेक्ट्रिक कण्डक्टिव्हिटी याचाही तपास करणारी सेन्सर्स यंत्रणा यामध्ये आहे.

    ही यंत्रणा दर अर्ध्या तासाला जमिनीत आणि जमिनीबाहेर तसेच हवेत घडणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती सेन्सर्सद्वारे सॅटॅलाइटला पाठवतात. सॅटॅलाइटद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर असलेल्या संगणकाला पोहोचवतात. त्यातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची यंत्रणा त्या पिकाला नेमकी कशाची कमतरता आहे. ती किती प्रमाणात द्यावयाची आहे, याची भरीव माहिती संबंधित शेतकऱ्याला देतात. त्याद्वारे जमिनीच्या मध्ये किती पाणी द्यायचे, किती नत्र, कोणत्या प्रकारचे खत, किती प्रमाणात द्यायचे याचे संपूर्ण नियोजन कळवले जाते.

    बारामतीमध्ये केलेला हा प्रयोग भारतामध्ये पहिल्यांदाच करण्यात आला असून तो जगातील पहिला प्रयोग मानला जात आहे. दरम्यान आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा वापर शेतीमध्ये करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने देखील पुढाकार घेतला असून बारामतीतील एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी महाविद्यालय आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ दरम्यान यासंदर्भात प्रयोग चालू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे यावर्षी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात येणारे कृषिक प्रदर्शनामध्ये शेती संकल्पना ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ठेवण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *