• Mon. Nov 25th, 2024

    नथुराम गोडसेच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी नाशिक ते पुणे यात्रा, शरद पोंक्षेंची खास उपस्थिती

    नथुराम गोडसेच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी नाशिक ते पुणे यात्रा,  शरद पोंक्षेंची खास उपस्थिती

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असताना, महात्मा गांधींच्या हत्येतील दोषी नथुराम गोडसे याच्या पुण्यातील अस्थिकलशाच्या दर्शनासाठी नाशिकमधून खास यात्रा काढली जाणार आहे. येत्या २० जानेवारी रोजी होऊ घातलेल्या या उपक्रमामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    नाशिकमधील काही समविचारी नागरिकांनी एकत्र येऊन या उपक्रमाचे नियोजन केले असून, त्यासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नाशिकमधून २० जानेवारी रोजी पहाटे चारला बस निघतील. भीमाशंकर येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर ही मंडळी पुण्यातील जंगली महाराज रोड येथील गोपाळ गोडसे व नथुराम गोडसेच्या घरी जाऊन अस्थिकलशाचे दर्शन घेतील. अखंड हिंदूराष्ट्र हे नथुराम गोडसेचे स्वप्न होते. सिंधू नदी भारताच्या सीमेत आल्यानंतरच आपल्या अस्थी विसर्जित कराव्यात, असे गोडसेने म्हटले होते. त्यामुळे त्याच्या अस्थी अद्याप जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. नथुरामचे बंधू गोपाळ गोडसे यांचे नातू अजिंक्य गोडसे यांच्याकडे त्या अस्थी आहेत. नाशिककर मंडळी त्या अस्थींचे दर्शन घेणार आहेत. या कार्यक्रमाला अभिनेते शरद पोंक्षेही उपस्थित राहणार आहेत.

    Hindu Mahasabha: ‘त्या’ तुरुंगातल्या मातीतून उभी राहणार गोडसेची मूर्ती, ‘हिंदू महासभे’ची घोषणा

    दरम्यान, या यात्रेच्या माहितीस्तव पाठविण्यात आलेल्या संदेशात २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर लोकार्पणाचे औचित्य नमूद करण्यात आले आहे. मात्र, आयोजकांनी त्याचा व या उपक्रमाशी संबंध नसल्याचे ‘मटा’ला सांगितले. श्रीराम मंदिर लोकार्पणाची तारीख निश्चित होण्यापूर्वीच या उपक्रमाचे नियोजन केल्याचे ते म्हणाले. या यात्रेत नाशिकमधील स्वामी श्रीकंठानंद सहभागी होणार असल्याचाही उल्लेख संबंधित संदेशात होता. मात्र, या उपक्रमाशी आपला संबंध नसल्याचे श्रीकंठानंद यांनी ‘मटा’ला सांगितले.

    माझा या उपक्रमाशी कोणताही संबंध नाही व मी यात्रेत सहभागी होणार नाही. दोन गोष्टींवरील चर्चेची सरमिसळ होऊन आयोजकांचा काही गैरसमज झाला असावा. त्यातून माझे नाव टाकले असावे. वादग्रस्त गोष्टी मला झेपत नाहीत.

    – स्वामी श्रीकंठानंद, अध्यक्ष, श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थान, नाशिक

    Exclusive:’मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकताला सौरभ गोखलेचा पहिला लूक आला समोर

    नथुराम हे राष्ट्रदेव आहेत. अखंड हिंदुस्थानसाठी एखादा राष्ट्रभक्त किती पराकोटीचा त्याग करू शकतो याचे ते उदाहरण आहेत. त्यांच्या या राष्ट्रभावनेला वंदन करण्यासाठी जाणार आहोत. त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली म्हणून नव्हे. त्यामुळे आम्ही ३० जानेवारी ही तारीख निवडलेली नाही.

    – मिलिंद कुलकर्णी, आयोजक, नाशिक

    नथुराम गोडसेचे कोणत्याही कारणाने उदात्तीकरण चुकीचेच आहे. त्याने महात्मा गांधी हत्येचे भयंकर कृत्य केले आहे. तरी अशी जाहीर यात्रा काढण्याची हिंमत या देशात होते हे दुर्दैवी आहे. सिंधू नदीचा काही भाग भारतात आजही आहेच. आपल्या आदरणीय व्यक्तीचा कोणी खून केल्यास आपण त्याचे समर्थन करू शकू का, याचा गोडसे समर्थकांनी विचार करावा.

    – डॉ. अभय बंग, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *