नागपुरात प्रस्तावित इंडिया आघाडीची सभा भलेही झाली नाही पण, काँग्रेसने नागपुरातून लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकण्याचे संकेत दिले. सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व मुकुल वासनिक यांनी गेल्या आठवड्यात बैठक घेऊन महारॅलीच्या तयारीची सूचना केली. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अन्य नेत्यांच्या विविध पातळीवर बैठका सुरू झाल्या. सभेसाठी दहा लाख लोकांचे टार्गेट पक्षाने ठेवले आहे. उपराजधानीत मोठ्या सभा कस्तुरचंद पार्कवर व्हायच्या. आता हे मैदान सभेला देण्यात येत नाही. त्यामुळे काँग्रेसला नव्या मैदानाचा शोध घ्यावा लागत आहे. वर्षाच्या सुरुवातीला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा नंदनवनमधील केडीके कॉलेजजवळील मैदानात झाली होती. पण, महारॅलीच्यादृष्टीने हे मैदान लहान आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोमवारी रात्री बैठक झाली. पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी आदी उपस्थित होते. यात सभा स्थळाबाबत प्राथमिक चर्चा झाली.
नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी, डॉ. नितीन राऊत, विकास ठाकरे, नाना गावंडे व अन्य नेत्यांनी दाभा येथील मैदानाची मंगळवारी सकाळी पाहणी केली. या मैदानावर अलीकडेच ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. रिंगरोडला लागून हे मैदानात असल्याने चारही दिशांनी वाहनांनी येणाऱ्या कार्यकर्त्यांना सोयीचे ठरणार आहे. पार्किंगची व्यवस्थाही सोयीस्कर आहे.
माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या डिगडोह येथील लोकमान्य टिळक जनकल्याण संस्थेचे प्रियदर्शनी कॅम्पसचे भव्य मैदानाची नेत्यांनी पाहणी केली. अभियांत्रिकीच्या विविध शाखांचा हा परिसर आहे. या ठिकाणी सर्व व्यवस्था असून विमानतळापासून अगदी जवळ आहे. याखेरीज उमरेड रोडवर दिघोरीच्या पुढे असलेल्या मैदानाचाही विचार करण्यात येणार आहे. पं. प्रदीप मिश्रा यांचा महिनाभरापूर्वी येथे कार्यक्रम झाला होता.
सभा स्थळासाठी राहुल गांधी यांच्या टीमने पाहणी केल्यानंतर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. सुरक्षा आणि तयारीच्यादृष्टीने बुधवारी दुपारपर्यंत मैदानात निश्चित केली जाईल. यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.