• Tue. Nov 26th, 2024
    विधानपरिषद प्रश्नोत्तरे

    मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नागपूर, दि. १९ : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला सोडण्यात येणार असून यावर्षीचे पाणी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सोडण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

    मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून पाणी सोडण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. या चर्चेत सदस्य एकनाथ खडसे, बाबाजानी दुर्राणी, सुरेश धस यांनी सहभाग घेतला.

    यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मेंढेगिरी समितीच्या समन्यायी तत्वानुसार मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडण्यात येत असते. परंतु, स्थानिक परिस्थितीनुसार पाणी सोडण्याचा कालावधी पुढे-मागे होत असतो.  न्यायालयातही मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी शासन ठाम भूमिका घेईल. पुढील काळात पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, ती पिण्याच्या पाण्याचे नियोजन करेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

    00000

    दत्तात्रय कोकरे/विसंअ/

    ——————–

    मोजमाप पुस्तिका गहाळ प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नागपूर, दि. 19 : धाराशिव नगरपालिकेंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याप्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (SIT) केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

    धाराशिव नगरपालिकेंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याप्रकरणी गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई होत असल्याबाबतचा प्रश्न सदस्य सुरेश धस यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या चर्चेत सदस्य नरेंद्र दराडे यांनी सहभाग घेतला होता.

    उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, धाराशिव नगरपालिकेंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याप्रकरणी गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई आणि चालढकल होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (SIT) केली जाईल.

    00000

    दत्तात्रय कोकरे/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed