मिळालेल्या माहितीनुसार, संगमेश्वरजवळील एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या धक्कादायक प्रकाराने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दहावीत शिकणाऱ्या एका मुलीचा मोबाईल नंबर आरवली परिसरात राहणाऱ्या तरुणाने मिळवला. त्या आधारे तिला तो कायम संपर्क करत होता. ती मुलगी त्याचा फोन टाळत असे. मात्र तरीही सतत फोन करीत होता. अखेर नाईलाजाने त्याचा फोन तिने स्वीकारला. तो सातत्याने तिला तुझ्यावर प्रेम आहे वगैरे सांगू लागला. मात्र ती मुलगी त्याला टाळत होती. पण तरी तो तिच्या सातत्याने फोनवर संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर तो मुंबईतून गावी आला. मुंबईहून तो १३ डिसेंबरला चिपळूण सावर्डे परिसरात दाखल झाला. त्याने त्या मुलीला कॉल केला. ‘मला फक्त तुला एकदा भेटायचे आहे, मी मुंबईहून तुझ्याजवळ बोलायचे म्हणून आलो आहे. मला फक्त एकदाच भेट दे’ अशी विनंती करू लागला होता.
त्यानंतर तिच्या घराजवळ जाऊन तिला त्याने बाहेर बोलावले. जबरदस्तीने गाडीवर बसवून आपल्या मित्राच्या घरी आणले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. या अतिप्रसंगाने ती मुलगी जागीच बेशुद्ध पडली. तेव्हा तिला तिथेच टाकून त्या तरुणाने पलायन केले. दीड दोन तासानंतर ती शुद्धीवर आंल्यानंतर घरात पोहचली. पूर्णतः भयभीत झालेल्या आपल्या लेकीला बघून वडील आणि नातेवाईक यांनाही मोठा धक्का बसला. तिने आपल्यावर ओढावलेला प्रसंग घरी सांगितला. त्यानंतर गुरुवारी सकाळी तिचे नातेवाईक तिला घेऊन पोलीस स्थानकात दाखल झाले. एका अल्पवयीन मुलीवर ओढवलेल्या या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जयवंत गायकवाड यांनी तात्काळ तपासाची सूत्र हलविली.
आपल्या कर्मचाऱ्यासह स्वतः त्या तरुणांचा सर्वत्र शोध घेतला. रेल्वे स्टेशन, बस स्थानक परिसरात पोलीस पथक तैनात करण्यात आली. अखेर या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्या तरुणाच्या मोबाईलमधून अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार त्याच्या विरोधात भादवी कलम ३७६, बाल लैगिंग शोषण (पोस्को) नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चिपळूण सावर्डे पोलीस करीत आहेत. अशी माहिती चिपळूण येथील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून या सगळ्याचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर तात्काळ पुढील कठोर कारवाई करण्यात येईल, अशी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. या संतापजनक प्रकारानंतर जिल्हाभरातून संतापजनक भावना व्यक्त होत आहेत. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घेतली आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असून पुरावे मिळताच अटक केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.