मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्ताने ३० ऑक्टोबर २०२३ रोजी बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी व बीड शहरात भर दुपारी जाळपोळीच्या घटना घडल्या. जमावधारकांनी तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या राहत्या घरावर जीवघेणा हल्ला करून घरं पेटवून देण्याचा प्रकार घडला. जाळपोळ सुरू असताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती, हा मुद्दा आमदार संदीप क्षीरसागर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. बीड जिल्ह्यात हा प्रकार झाला हा संपूर्ण महाराष्ट्राने बघितला. ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आमदारांच्या घरांवर हल्ले होऊन त्यांची सुरक्षा धोक्यात येते, हा गंभीर मुद्दा आहे. माझे घर ८ तास जळत होते तेव्हा पोलीस कुठे होते, असा सवाल क्षीरसागर यांनी उपस्थित केला. गृहमंत्री यांनी या प्रकरणी न्यायालयीन चौकशी लावावी, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली.
मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू
या प्रकरणात २७८ आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. यातील ३० आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. माजलगावच्या घटनेत ४० गुन्हेगार फरारी आहे. त्यांचा शोध घेणे सुरू आहे. बीडच्या घटनेत ६१ गुन्हेगार सापडले नाही. त्यांचा शोध घेणे सुरू आहे. ज्या आरोपींना पकडले त्यांचे व्हाट्सअप मॅसेजेस, मोबाइल लोकेशन तपासण्यात आले आहे. पुरावा आढळलेल्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांची संख्या आणि दंगलखोर यांची संख्या यात मोठा फरक होता. नवीन पोलिस फोर्स पाठवेपर्यंत दंगलखोरांना नियंत्रित करणे कठीण होते. असे हल्ले करणे हे नियोजित आहे का, याचाही शोध घेतला जाईल, याचे मास्टर माइंड कोण आहेत, याचाही शोध घेतला जाईल, असे फडणवीस म्हणाले. गुप्त वार्ता विभागाकडून अशी कुठलीही माहिती मिळाली नव्हती, असेही फडणवीस यांनी सांगितले.
एसआयटी स्थापन करणार
एवढा मोठा हल्ला होऊनही इंटेलिजन्स विभागाला कळू नये, यात आश्चर्य आहे. बीडमध्ये काही होणार आहे, अशी माहिती आधीच देण्यात आली होती. त्यामुळे हलगर्जीपणा झाला आहे, यात शंका नाही. पोलिस कमी असतातच. हवेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात का नाही आणली? असा मुद्दा आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांनी एसआयटीची घोषणा करूनही ती अद्याप स्थापन का केली नाही, असे जयंत पाटील म्हणाले. सराईत गुन्हेगार या मॉबमध्ये सापडले असे पोलिसांचे म्हणणे आहे, मात्र हे आधी लक्षात आले नाही का? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. दोन दिवसांत एसआयटी स्थापन करू, असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.