मुंबई महापालिकेने इलेक्ट्रिक डबलडेकर बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यावर नवी मुंबई महापालिकेनेही या बसगाड्यांच्या खरेदीसाठी रस दाखवला होता. त्यानुसार सर्वप्रथम एक बस प्रायोगिक तत्त्वावर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही बस पर्यटनाच्या दृष्टीने शहरात फिरवून तिला कसा प्रतिसाद मिळणार, याचा अंदाज घेतला जाणार होता. त्यानुसार अन्य १० बसगाड्याखरेदीचा विचार केला जाणार होता. फेब्रुवारीमध्ये मुंबईत पहिली इलेक्ट्रिक डबलडेकर बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेनेही गेल्या वर्षी १० इलेक्ट्रिक डबलडेकर घेण्याचा निर्णय घेतला होता आणि तशी खरेदीची ‘वर्क ऑर्डर’ही काढली होती.
दहापैकी पहिली बस २०२२ वर्षअखेर दाखल होणे अपेक्षित होते, मात्र २०२३ डिसेंबर होत आला तरी अजूनही पहिली बस एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल झालेली नाही. त्यातच मुंबईमध्ये इलेक्ट्रिक डबलडेकर बस दाखल झाल्याने आणि त्यातून प्रवासही सुरू झाल्याने नवी मुंबईकरांचेही लक्ष या ‘डबलडेकर’कडे लागले आहे. मात्र उशीर झाल्याने एनएमएमटी प्रशासनाने दहा बसगाड्या एकाच वेळी खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने त्यानुसार या डिसेंबर महिनाअखेर १० बसगाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली आहे.
अर्थसंकल्पातही तरतूद
उत्पन्नवाढीच्या दृष्टिकोनातून एनएमएमटीच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. आधुनिक शहराला शोभेशी परिवहन सेवा देण्यासाठी शहरात डबलडेकर बसगाड्या चालवण्याचा निर्णय एमएमएमटी प्रशासनाने घेतला आहे. अशा १० डबलडेकर बसगाड्यांसाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली आहे.
प्रेक्षणीय स्थळांवर धावणार बस
या डबलडेकर बसच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना नवी मुंबई दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. नवी मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी ही बस सुरू करण्याचे परिवहनचे प्रयोजन आहे. एका बसगाडीची किंमत एक कोटी ९० लाख रुपये आहे. बस तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार डिसेंबरअखेर या बसगाड्या दाखल होणार आहेत.
उत्पन्न वाढणार
सध्या एका इलेक्ट्रिक बसमधून प्रति किमी ४० रुपये उत्पन्न एनएमएमटीला मिळत आहे. या डबलडेकर बसगाडीमधून हे उत्पन्न सरासरी ६० ते ६५ रुपयांपर्यंत नेता येईल. त्यातून उत्पन्नवाढीचा चांगला पर्यायही मिळेल, असा विश्वास परिवहनला आहे.
या इलेक्ट्रिक डबलडेकर बस डिसेंबरअखेर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षात नवी मुंबईकरांना डबलडेकर बसगाडीमधून प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे.
– राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका