विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशातील दुसऱ्या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. सत्ताधारी पक्ष तसेच विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांनी जोरदार भाषण ठोकून मराठा आरक्षणाचा आणि मराठा समाजातून आलेल्या मुख्यमंत्रिपदाचा धागा जोडणाऱ्यांचा समाचार घेतला.
मराठा समाजाला राजकीय आरक्षण अजिबात नकोय
मराठे तुमच्याकडे मागतायेत काय? जो तो म्हणतो इतके मराठे मुख्यमंत्री होते… मुख्यमंत्रिपद हे काय उत्पन्नाचं साधन आहे काय? की समाजसेवेचं साधन आहे? जरी मराठा समाजाचे ५-१० मुख्यमंत्री झालेले असले तरी समाज श्रीमंत झाला की काय? समाजातले काही लोक श्रीमंत झाले म्हणजे संपूर्ण समाज श्रीमंत झाले की काय? मराठ्यांना उत्पन्नाचं साधन काय ते सांगा. मराठा समाज तुमच्याकडे केवळ शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मागतोय. त्यांना राजकीय आरक्षण अजिबात नकोय, असं भास्कर जाधव यांनी ठासून सांगितलं.
आरक्षण कसं द्यायचं ते सरकारने ठरावावं, आम्ही याप्रश्नी त्यांच्यासोबत
मराठा आरक्षणासाठी विविध आयोगांनी काम केलं. मी त्यांचा नामोल्लेख पुन्हा पुन्हा करणार नाही. पण २०१४ साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने तिथून सुरूवात तरी केली पण अजून त्याचा शेवट झालेला नाही. ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने १६ टक्के मराठा समाजाला आणि ५ टक्के मुस्लीम समाजाला आरक्षण दिलं होतं, त्यावेळीही आमची भूमिका तीच होती आणि आजही आमची भूमिका तीच आहे. कुणाच्याही ताटातलं काढून मराठा समाजाला आरक्षण नकोय. कोणत्याही प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता कोणत्या मार्गाने आरक्षण द्यायचं, जातवार जनगणना करून द्यायचं, एडब्ल्यूएसमधून द्यायचं की त्यात १० टक्के भर टाकायची, हे सरकारने ठरवावं. आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं भास्कर जाधव म्हणाले.
कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यायचंच ही जर सरकारी पक्षाची आणि विरोधकांची देखील मागणी असेल तर ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे, अशा कंड्या कोण पिकवतंय, हे समोर येणं गरजेचं आहे, असंही भास्कर जाधव म्हणाले.