• Mon. Nov 25th, 2024
    पृथ्वीराजबाबांच्या जागी विखे मुख्यमंत्री होणार होते, पण राहुल गांधी यांची भेट झाली अन्…

    नागपूर : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांचा राजीनामा घेत तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचा झालेला निर्णय ऐनवेळी फिरला आणि २०१४ ला शेवटच्या वर्षात मुख्यमंत्री बननण्याच्या विखे पाटील यांच्या मनसुब्यावर पाणी फिरल्याची खमंग चर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात रंगली आहे.

    राज्यातील एका वरिष्ठ नेत्याने मंगळवारी सकाळी पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना २०१४ साली चव्हाण यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात येणार होता. त्यांच्या जागी राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात आणि हर्षवर्धन पाटील यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत होती, असा खळबळजनक खुलासा केला आहे.

    याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार २०१४ साली आषाढी एकादशीनंतर चव्हाण यांचा राजीनामा होणार होता. त्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू होत्या. मुख्यमंत्री या नात्याने चव्हाण यांनी आषाढी एकादशीची पुजा केली आणि त्यानंतर त्यांनी दिल्ली गाठली. त्यावेळी परदेशातून परतलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय मावळला होता.

    विखे पाटील हे सुद्धा त्याच काळात मुख्यमंत्रीपद मिळण्याच्या आशेने दिल्लीत तळ ठोकून होते. त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी आवश्यक राजकीय जुळवाजूळवही केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना ग्रीन सिग्नलही दर्शविला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आणि चव्हाण यांचे राजकीय संबंध ताणले गेले होते. अशा काळात विखे पाटील यांना मुख्यंमंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती.

    विखे पाटील एक-दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, याचीही उच्चपदस्थ वर्तुळात अटकळ बांधण्यात येत असताना ऐनवे‌ळी त्यांचे मुख्यमंत्री पद हुकले. त्यानंतर २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आणि विखे पाटील हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले. तर, २०१९ च्या आषाढी एकादशीच्या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed