• Sat. Sep 21st, 2024

नवी मुंबईकरांनो…आता बसमध्ये मोबाईल वापरताना पाळावा लागेल नियम; अन्यथा होणार कारवाई, जाणून घ्या

नवी मुंबईकरांनो…आता बसमध्ये मोबाईल वापरताना पाळावा लागेल नियम; अन्यथा होणार कारवाई, जाणून घ्या

नवी मुंबई : बेस्टपाठोपाठ आता नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमानेदेखील एनएमएमटी बसमधून प्रवास करताना मोबाइल फोनवर मोठ्या आवाजात बोलण्यास किंवा मोठ्या आवाजात गाणी, व्हिडीओ वाजवण्यास मनाई केली आहे. सहप्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एनएमएमटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एनएमएमटी प्रशासनाने नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

सार्वजनिक उपक्रमांच्या बसमधून प्रवास करताना अनेकजण मोबाइल फोनवर मोठमोठ्याने संभाषण करतात किंवा मोठ्या आवाजात गाणी, व्हिडीओ वाजवतात. यामुळे सहप्रवाशांना त्याचा त्रास होतो. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांकडे मोबाइल असतात. त्यांच्याकडून बसमध्ये मोबाइलचा मुक्तपणे वापर करण्यात येतो. अनेक प्रवासी जोरजोरात मोबाइल फोनवर बोलत असतात. तसेच काही प्रवासी मोबाइलवर ऑडिओ, व्हिडीओ ऐकत-बघत असतात. स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या आवाजाची पातळी जास्त असल्यामुळे बसमधील अन्य प्रवाशांना त्याचा त्रास होत असल्याचे आढळून आले आहे. मोबाइलच्या आवाजाच्या कारणावरून बसमध्ये प्रवाशांमध्ये वादविवादाचे प्रकार होऊ लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमानेदेखील आपल्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोबाइल फोनवर मोठ्या आवाजात बोलण्यास किंवा मोठ्या आवाजात गाणी, व्हिडीओ वाजवण्यास मनाई केली आहे. याबाबतचे आदेश नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी नुकतेच जारी केले आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाची (एनएमएमटी) सेवा ही सार्वजनिक परिवहन सेवा असल्याने व बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास अन्य प्रवाशांकडून होऊ नये, यासाठी मुंबई पोलिस कायद्याअंतर्गत (कलम ३८/१,२ व ११२) संबंधित प्रवाशांवर कारवाई होऊ शकते, असे या आदेशात म्हटले आहे. एनएमएमटी परिवहन उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये इयरफोनशिवाय मोबाइलवर ऑडिओ / व्हिडीओ लावण्यास तसेच मोठ्या आवाजात बोलण्यास मनाई करण्यात येत असल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. परिवहन उपक्रमातील सर्व चालक, वाहक व पर्यवेक्षकीय कार्मचाऱ्यांनी याची नोंद घेऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बेस्ट बससंबंधी मोठी बातमी; ‘या’ व्यक्तींना करता येणार मोफत प्रवास, ११ डिसेंबरपासून मिळणार सवलत
दररोज पावणे दोन लाख प्रवासी

एनएमएमटी उपक्रमाच्या ताफ्यात जवळपास ५६७ बसगाड्या असून त्या ७४ मार्गावर रोज प्रवासी वाहतूक करत आहेत. यामध्ये मुंबईतील मंत्रालय, दादर, वांद्रे, बोरिवली, मुलुंड, ठाणे, पनवेल, खोपोली, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, बदलापूर, कर्जत, रसायनी उरण, तळोजा या भागांचा समावेश आहे. एनएमएमटीच्या बसमधून दररोज एक लाख ८० हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed