संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा १२ डिसेंबरपर्यंत साजरा होणार आहे. या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायात मोठे महत्त्व आहे. ‘यात्रे अलंकापुरी येतील, ते आवडती विठ्ठला,’ या संतवचनाची आठवण मनात बाळगून राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरांवर हरिनामाचा गजर चालू आहे. ठिकठिकाणच्या धर्मशाळांमध्ये भजन, कीर्तन, हरिपाठ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्तिकी एकादशीनिमित्त माउलींच्या संजीवन समाधी मंदिरात पहाटे दोनपर्यंत ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात पवमान अभिषेक, दुधारती करण्यात आली. सनई चौघड्याच्या सुरावटीने समाधी मंदिरातील वातावरण मंगलमय झाले होते. विविधरंगी फुलांच्या सजावटीने परिसराला शोभा प्राप्त झाली होती. महापूजेनंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त अॅड. विकास ढगे-पाटील, योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, अॅड. राजेश उमाप यांच्या हस्ते मान्यवरांना नारळाचा प्रसाद देण्यात आला. पूजेच्या मानकऱ्यांना ज्ञानेश्वरीची प्रत आणि पसायदानाची प्रतिमा भेट देण्यात आली.
माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवण्यात आला होता. त्यांचे मनमोहक रूप साकारण्यात आले होते. दुपारी महानैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर श्रींच्या पालखीची आणि रथाची नगरप्रदक्षिणा झाली. या वेळी संपूर्ण मार्गावर माउलींच्या नामाचा गजर चालू होता. वीणा मंडपात बाबासाहेब देहूकर आणि वासकर महाराजांची कीर्तनसेवा झाली. त्याचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला.
मंदिर परिसरात स्वच्छता
‘स्वकाम सेवा मंडळा’च्या स्वयंसेवकांनी मंदिर आणि परिसरात अहोरात्र स्वच्छता केली. याशिवाय विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने भाविकांच्या दर्शनबारीत पिण्याचे पाणी, अन्नदान, आरोग्य तपासणी, मोफत औषधवाटप या सेवा देण्यात आल्या. इंद्रायणी तीरावर जलप्रदूषणाबाबत जनजागृती करण्यात आली.
आडे दाम्पत्याला दुसऱ्यांदा मान
यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील परतवाडी गावच्या शेषराव सोपान आडे आणि त्यांच्या पत्नी गंगुबाई या दाम्पत्याला मिळाला. त्यांना २०२१मध्येही हा मान मिळाला होता. ‘माउलींच्या कृपेमुळे सेवेची संधी मिळाली,’ अशी भावना आडे दाम्पत्याने व्यक्त केली. ‘सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे,’ अशी मागणी माउलींच्या चरणी केल्याचे आडे यांनी सांगितले.
सोमवार (११ डिसेंबर) कार्यक्रमाची रूपरेषा
पहाटे ३ ते ४ : पवमान अभिषेक, दुधारती
पहाटे ५ ते ९.३० : भाविकांच्या महापूजा
सकाळी ९ ते १२ : संजीवन समाधी सोहळा कीर्तन
दुपारी १२ ते १२.३० : घंटानाद, पुष्पवृष्टी
दुपारी १२.३० ते १ : श्रींना महानैवेद्य
सायं. ६.३० ते ८.३० : देहूकरांतर्फे कीर्तन सेवा
रात्री ८.३०नंतर : धुपारती, भजन, जागर