• Sun. Mar 8th, 2026

    Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यांनंतर बाहेर येणार; धनंजय देशमुखांनी नोंदवला आक्षेप

    Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यांनंतर बाहेर येणार; धनंजय देशमुखांनी नोंदवला आक्षेप

    Beed Crime: आरोपीच्या या अर्जावर फिर्यादी पक्षाकडून, विशेषतः धनंजय देशमुख यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला होता.

    सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यांनंतर बाहेर येणार; धनंजय देशमुखांनी नोंदवला आक्षेप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुनील जाधव, बीड: बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी नुकतीच जिल्हा व विशेष न्यायालयात पार पडली असून, कायदेशीर घडामोडींना वेग आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला सध्या अंतिम टप्प्यात असून, संपूर्ण महाराष्ट्राचे या निकालाकडे लक्ष लागलं आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणी दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणाची पुढील तारीख २४ मार्च निश्चित केली आहे. मात्र, या सुनावणीत एका नवीन अर्जामुळे वादाला तोंड फुटले आहे.

    जयराम चाटेचा न्यायालयाकडे अर्ज
    या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला जयराम चाटे याने न्यायालयाकडे एक विनंती अर्ज दाखल केला होता. आपल्या भावाचा मृत्यू झाल्याचे कारण देत, भावाच्या पश्चात करावयाच्या धार्मिक विधींसाठी आपल्याला काही काळासाठी बाहेर जाण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी चाटे याने या अर्जाद्वारे केली होती. या अर्जानंतर न्यायालयाने १३ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत जयराम चाटे याला पोलीस बंदोबस्तात धार्मिक विधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.

    धनंजय देशमुख यांचा तीव्र विरोध
    धनंजय देशमुख यांनी न्यायालयासमोर आणि प्रशासनासमोर काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. देशमुख यांच्या मते, संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे परिसरात आधीच दहशतीचे आणि तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत जर मुख्य आरोपीला कोणत्याही कारणास्तव जामीन किंवा तात्पुरती रजा देऊन बाहेर सोडले, तर त्याचा परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतो.

    धनंजय देशमुखांचे प्रशासनाला सवाल
    “आरोपीला बाहेर सोडल्यास परिसरात पुन्हा संघर्षाची ठिणगी पडू शकते. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासन घेणार का, आरोपी बाहेर आल्यास या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारांवर दबाव टाकला जाण्याची किंवा त्यांना धमकावण्याची दाट शक्यता आहे. पीडित कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न या निर्णयामुळे ऐरणीवर येऊ शकतो,” असं धनंजय देशमुख म्हणाले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा