Pune Teacher Death: नामांकित कॉलेजमधील विभागप्रमुखाने टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत शिक्षण क्षेत्रात चर्चा होत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (६ मार्च) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास राजू पाटील यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. काही वेळाने त्यांची पत्नी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घरात पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच पत्नीला मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.
घटनास्थळाची पाहणी करताना पुणे पोलिसांना एक चिठ्ठीही आढळून आली. प्राथमिक माहितीनुसार, कामाच्या प्रचंड ताणामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख त्या चिठ्ठीत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या संदर्भातील सर्व बाबींची खातरजमा पोलीस तपासानंतरच होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राजू पाटील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांची पत्नीही सिंहगड डेंटल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पाटील यांचे सहकारी आणि विद्यार्थ्यांना धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या आत्महत्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनय पाटणकर करत असून पोलीस तपासानंतर अपघाताचं नेमकं कारण उघड होणार आहे.
