• Sat. Sep 21st, 2024

तुरूंगात प्लॅन केला, जेलबाहेर येऊन अंमलबजावणीही केली, पण पोलिसांनी पकडलंच!

तुरूंगात प्लॅन केला, जेलबाहेर येऊन अंमलबजावणीही केली, पण पोलिसांनी पकडलंच!

म.टा. प्रतिनिधी, नागपू : हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथील सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. कृष्णा ऊर्फ जॉन तिवडू पंचेश्वर (२७) आणि अशोक कांदू चौधरी (२४, दोघेही रा. श्रमिकनगर, परसोडी) अशी अटकेतील लुटारूंची नावे आहेत. कृष्णा अलीकडेच तुरुंगातून सुटून आला आहे. तुरुंगातील एका कैद्यासोबत त्याने तुरुंगातच या लुटमारीची योजना तयार केल्याचे समोर आले आहे. अद्याप या दुसऱ्या कैद्याचे नाव समोर यायचे आहे.

ही घटना २ डिसेंबरला रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली होती. अतुल रामकृष्ण शेरेकर यांचे टाकळघाट येथे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. त्यांना या दोघांनी लुटले होते. आरोपी कृष्णा हा अट्टल चोरटा आहे. त्याची काही दिवसांपूर्वी नागपूर शहरातील मध्यवर्ती तुरुंगातून सुटका झाली होती. तुरुंगात त्याची एका सहकैद्याशी ओळख झाली. त्याने कुष्णाला अतुल शेरेकर यांच्या दुकानासह त्यांच्या घरी जाण्याची वेळ, सोबत असणारी बॅग, त्यातील साहित्य याबाबत माहिती दिली होती. त्यामुळे कृष्णाने तुरुंगातच अतुल शेरेकर यांना लुटण्याची योजना आखली होती. येताच त्याने त्याची अंमलबजावणीही केली. मात्र, तो परत एकदा पोलिसांच्या हाती लागला.

असे लुटले

अतुल रामकृष्ण शेरेकर यांचे टाकळघाट सराफाचे दुकान असून, ते शनिवारी रात्री दुकान बंद करून घरी जात होते. दुचाकीवर आलेल्या अनोळखी दोघांनी त्यांच्या वाहनाला धडक दिली व अडविले. त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर झाकून त्यांच्याकडील दागिने व रोख रकमेची बॅग हिसकावून घेत दोघांनी लगेच तेथून पळ काढला.

एलसीबीच्या सहाय्याने अटक

या घटनेच्या समांतर तपासात एलसीबीच्या पोलिस अधिकाऱ्यांना महत्त्वाची माहिती प्राप्त झाली होती. त्याआधारे एलसीबीच्या पथकाने सोमलवाडा, नागपूर येथे किरायाने राहणाऱ्या कृष्णा व अशोकला शुक्रवारी सकाळी शिताफीने ताब्यात विचारपूस केली. दोघांनीही अतुल शेरेकर यांना लुटल्याचे स्पष्ट होताच त्यांना लगेच अटक केली. त्यांच्याकडून एकूण ४८ लाख ६२ हजार ५४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, एमआयडीसी बुटीबोरीचे ठाणेदार महादेव आचरेकर, एलसीबीचे सहायक पोलिस निरीक्षक राजीव कर्मलवार यांच्या पथकाने केली.

बालपणीच्या मित्राची मदत

आरोपी अशोक चौधरी हा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कृष्णाच्या सहकैद्याचा बालपणीचा मित्र आहे. तुरुंगातून सुटका होताच कृष्णाने त्या कैद्याच्या सूचनेवरून अशोकची भेट घेतली आणि त्याला योजनेची संपूर्ण माहिती देत योजनेत सहभागी करून घेतले. या दोघांनी गुन्ह्यासाठी एक दुचाकीसुद्धा चोरली.

अशी होती योजना

अतुल शेरेकर यांच्या कारला दुचाकीने समाेरून धडक मारायची. धडक लागताच कृष्णा अतुल यांच्या मागे जावून मदतीचे नाटक करेन आणि त्यांच्या डाेळ्यात मिरची पावडर झोकेल. त्यानंतर त्यांच्याजवळील दागिन्यांची बॅग हिसकावून घेत पळ काढायचा, अशी याेजना कृष्णाने आखली हाेती आणि याच पद्धतीने त्याने अतुल शेरेकर यांना लुटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed