• Sat. Sep 21st, 2024

नवाब मलिक कोणत्या गटात? प्रश्नांच्या सरबत्तीने अजितदादा भडकले, फडणवीसांच्या पत्रावर म्हणाले…

नवाब मलिक कोणत्या गटात? प्रश्नांच्या सरबत्तीने अजितदादा भडकले, फडणवीसांच्या पत्रावर म्हणाले…

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमच्या गटाने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत नवाब मलिक यांना कोणतीही माहिती नव्हती. हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने ते पहिल्यांदाच सभागृहात आले होते. मात्र, ते कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी या सगळ्यावर प्रतिक्रिया देईन, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना गुरुवारी रोखठोक भाषेत पत्र धाडून नवाब मलिक यांच्या सत्ताधारी गटातील समावेशाला विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची आजची प्रतिक्रिया सूचक आणि अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अजितदादांच्या एकूण बोलण्याचा रोख पाहता आगामी काळात अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना अंतर दिले जाण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात लिहेलेल पत्र मला मिळाले, ते मी वाचलं. नवाब मलिक हे काल पहिल्यांदाच सभागृहात आले होते. ते सभागृहात कुठे बसले, याबाबत मीडियाने माहिती दिली. पण आम्ही महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर नवाब मलिक हे पहिल्यांदाच सभागृहात आले होते. त्यांची भूमिका काय आहे, हे ऐकल्यानंतरच मी त्यांच्याबद्दल माझं मत देईन. नबाव मलिक यांना न्यायालयाने वैद्यकीय कारणामुळे बाहेर येण्याची संधी दिली आहे. त्यांच्यावरील केस अजून सुरु आहे. सभागृहात कोणी कुठे बसायचे, हा माझा अधिकार नाही. तो निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात. नवाब मलिक कोणासोबत आहेत, हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच मी बोलेन. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राबाबत काय करायचं ते मी करेन. त्याबाबत मीडियाला सांगण्याचं काही कारण नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांच्यावर एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे अजित पवार चांगलेच वैतागल्याचे दिसत होते.

मलिकांवर आरोप म्हणून महायुतीत नको, मग अजितदादांवरही आरोप, त्यांचा पाठिंबा घेताना तुमची नैतिकता कुठे गेली होती? : अंधारे

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही नवाब मलिक विधिमंडळात उपस्थित होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर मलिक यांनी कायदेशीर कारण देत बोलण्यास नकार दिला.

देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना तीव्र विरोध, सुनील तटकरेंचं चार ओळीत उत्तर, दादांचंही समर्थन

नवाब मलिकांवरुन इतका मोठा वाद का?

जमीन गैरव्यवहारप्रकरणात ईडी कोठडीत तुरुंगवास भोगलेल्या आणि भाजपकडून देशद्रोहाचे आरोप झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चांगलीच कोंडी झाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी नवाब मलिक हे सभागृहात बसले होते. यावेळी ते सत्ताधाऱ्यांच्या रांगेत शेवटच्या बाकावर बसले होते. इतके दिवस भाजपने देशद्रोहाचे आरोप केलेले नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या रांगेत बसल्याने अनेकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. या सगळ्या घटनाक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संध्याकाळी अजित पवार यांना एक पत्र लिहले. योगायोगाने हे पत्र प्रसारमाध्यमांच्या हाती लागले. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना सोबत घेण्यास स्पष्ट विरोध केला होता. यानंतर अजित पवार काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

जामिनानंतर पहिल्यांदाच नवाब मलिक अधिवेशनात, अजित पवारांसोबत फोनवर बोलणं, कोणत्या गटात जाणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed