राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक सध्या जामिनावर बाहेर आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी सत्ताधारी बाकांवर बसून आपण अजितदादा गटाला पाठिंबा दिल्याचं अप्रत्यक्षरित्या सूचित केलं. यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत भाजपवर जोरदार टीका करत देवेंद्र फडणवीस यांची कोंडी केली. ज्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या, त्यांच्याच बचावासाठी ढाली कशा वापरायच्या, ही भाजपची अडचण झाली होती. हेच लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहिलं. सत्ता येत जात असते. परंतु आपल्याला देश महत्त्वाचा आहे. देशद्रोहाचे आरोप असलेले नवाब मलिक महायुतीत नको, अशी भूमिका त्यांनी पत्रातून मांडली. फडणवीस यांच्या याच भूमिकांवर सुषमा अंधारे यांनी सडेतोड प्रश्न विचारले आहेत.
ज्या लोकांवर भाजपने आरोप केले त्यांना सत्तेत सामावून घेताना हा विवेकवाद कुठं गेला होता?
“नवाब मलिक यांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही, अशा आशयाचं पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिल्याचं समजतं. सगळाच गमतीदार भाग आहे. दिवसभरातील एकूण घडामोडी पाहता, देवेंद्रजी ज्या पद्धतीने ट्रोल झालेले आहेत आणि महाराष्ट्राला ते पचन झालेलं नाही. त्यानंतर त्यांना ही उपरती आलेली आहे. पत्रात ते सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा असल्याचं सांगत आहेत. परंतु देवेंद्रजींना आम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे, जर सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आपल्याला वाटत असेल तर मग आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांवर भाजपने आरोप केले त्यांना सत्तेत सामावून घेताना हा विवेकवाद कुठं गेला होता?” असा परखड प्रश्न सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांना विचारला आहे.
अजितदादा सत्तेत नको हे भाजपच्या कोणत्या नेत्याला पत्र लिहून सांगणार?
“देवेंद्रजी आपण ज्या अजितदादांना पत्र लिहिता आहात त्याच अजितदादांवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थात सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळा आणि बँक घोटाळ्याचे आरोप केले होते. एवढा गंभीर आरोप झाल्यानंतरही ४८ तासांच्या आत त्यांना सत्तेत सामावून घेणे हे तुमच्या नैतिकतेत बसले होते का? मग त्यावेळी सत्तेपेक्षा देश मोठा हे तत्वज्ञान तुम्हाला का सुचले नाही? अजितदादांना सत्तेत सामावून घेणे चुकीचे आहे, असे सांगणारे पत्र देवेंद्रजी आपण भाजपच्या कोणत्या नेत्याला लिहाल?” असा बोचरा प्रश्न विचारून सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांची चहुबाजूने कोंडी केली.