• Sat. Sep 21st, 2024

केंद्र सरकारने तुघलकी निर्णय मागे घ्यावा; इथेनॉल निर्मितीवरील बंदीच्या निर्णयावर राजू शेट्टी आक्रमक प्रतिक्रिया

केंद्र सरकारने तुघलकी निर्णय मागे घ्यावा; इथेनॉल निर्मितीवरील बंदीच्या निर्णयावर राजू शेट्टी आक्रमक प्रतिक्रिया

कोल्हापूर : केंद्र सरकारने इथेनॉलच्या उत्पादनावर घातलेली बंदी म्हणजे तुघलकी निर्णय असून हे आम्हाला कदापी मान्य नाही. देशात साखर कमी पडून साखरेचे दर वाढतील या भितीने केंद्राने इथेनॉल निर्मितीवरील घातलेली बंदी तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.

याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारने साखर उद्योगातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना प्रोत्साहन, सबसिडी व व्याजामध्ये सवलत देऊन इथेनॉलचे प्रकल्प उभे करण्यास सांगितले. साखर उद्योगाला चालना मिळावी यासाठी केंद्राने इथेनॉल निर्मितीला चालना दिली. यामुळे कोट्यवधी रूपयांचे भाग भांडवल देशातील साखर उद्योगाने यामध्ये गुंतवले आहेत. असे असताना देशात सारवर कमी पडते म्हणून अचानक केंद्र सरकारने इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घातलेली आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर देखील होणार आहे. केंद्र सरकार ही बंदी घालून शांत बसेल. मात्र इथेनॉलमध्ये साखर कारखान्यांनी अब्जावधी रूपये गुंतवले आहेत, त्याचे काय होणार आहे. याचे उत्तर केंद्र सरकारकडे नाही, असा आरोप शेट्टी यांनी यावेळी केला.

इथेनॉल निर्मितीस रस वापरण्यावर बंदी; ऊसाचे उत्पादन घटल्याचे पडसाद, साखर उत्पादन घटणार असल्याच्या अपेक्षेने निर्णय

देशात यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. त्याला केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत आहे. पुढील वर्षीही साखरेची परिस्थिती याहून अधिक गंभीर परिणाम होणार आहे. देशातील उसाचे क्षेत्र कशामुळे कमी झाले आहे. याच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे आहे. रासायनिक खतांच्या किंमती प्रचंड वाढलेल्या आहेत. उत्पादन खर्च वाढलेला आहे. शेतकऱ्यांना उसाची शेती परवडत नाही.

देशात दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीमध्ये देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तातडीने आर्थिक सहाय्य करणे गरजेचे आहे. त्यांना ऊस लागवडीमध्ये प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. तरच देशातील उसाचे उत्पादन वाढून साखर उत्पादीत होणार आहे. केंद्राने घेतलेला हा विदुषकी निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed