• Sat. Sep 21st, 2024

पाचपैकी तीन राज्यात भाजपची सत्ता, त्यामुळं विरोधकांचं अवसान गळालं:एकनाथ शिंदे

पाचपैकी तीन राज्यात भाजपची सत्ता, त्यामुळं विरोधकांचं अवसान गळालं:एकनाथ शिंदे

नागपूर : ‘मागील सरकारमधील अहंकारी नेत्यांमुळे जनतेचे नुकसान झाले आहे. आम्हाला दिल्लीची कठपुतली म्हणणाऱ्यांनो, तुमचे सत्तेचे दोर नागरिकांनीच कापून टाकले आहेत. आमच्या सरकारचा विकासकामांवर भर असून आमच्या दोऱ्या जनतेच्या आणि लोकशाहीच्या हातात आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

राज्याचे हिवाळी अधिवेशन आज, गुरुवारपासून नागपुरात सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. शिंदे यांनी नुकत्याच पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून विरोधकांना लक्ष्य केले. ‘पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तीन राज्यांत भाजपला यश मिळाल्याने विरोधी पक्षाचे अवसान गळाले आहे. लोकशाहीमध्ये जनता जनार्दनाचा कौल महत्त्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा संपला असे म्हणणाऱ्यांना देशातील जनतेने जागा दाखवून दिली असून त्यांनी मोदी यांच्या गॅरंटीवर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होतील याची हमी आता जनतेनेच देऊन टाकली आहे’, असे शिंदे म्हणाले.

‘आमच्याकडे स्वाभिमान नसल्याचे विरोधक सांगत आहेत. वास्तविक ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची परवानगी नाही, त्यांनी आमच्यावर आरोप करायचे? स्वाभिमानाची भाषा करायची? आम्ही दिल्लीला केंद्रातून निधी आणण्यासाठी जातो. राज्याच्या विकासासाठी निधी मागितल्याशिवाय मिळत नाही. त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. गेल्या अडीच वर्षांत अंहकारामुळे हे घरातून बाहेर पडले नाहीत. त्यांच्या अहंकारामुळे केंद्र सरकारने पैसे दिले नाहीत. राज्याचे नुकसान झाले. अनेक प्रकल्प बंद पाडले तर यांनी काही प्रकल्प स्थगित केले. आमचे सरकार आल्यापासून मेट्रो, आरेपासून अनेक प्रकल्प सुरू केले. हे सर्व प्रकल्प बंद पाडण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी जलयुक्त शिवारसारख्या प्रकल्पाची चौकशी सुरू केली’, अशा शब्दांत शिंदे यांनी विरोधकांवर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर टीका केली.

‘टिकणारे आरक्षण देऊ, विश्वास ठेवा!’

‘आम्ही आरक्षणाबाबत सुरुवातीपासून सकारात्मक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी आणि इतर समजावर अन्याय होणार नाही. कुणाचेही आरक्षण कमी केले जाणार नाही, ही आमची भूमिका स्पष्ट आहे. मुंबईमध्ये दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आम्ही आरक्षणाबाबत हमी दिली आहे. आमच्या सरकारची भूमिका मराठा समाजास आरक्षण देण्याची आहे’, असे शिंदे म्हणाले. मराठा समाजाला आम्ही टिकणारे आरक्षण देणार असून त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवावा. नोदींच्या संदर्भामध्ये शिंदे कमिटी काम करत आहे. याबाबतचा जीआर आधीचा असून आम्ही नवीन काम करत नाही. ज्या जुन्या नोंदी आहेत, वंशावळी, रक्ताची नाती आहेत, याबाबत नोंदी सुरू आहेत’, असे आवाहन शिंदेंनी यावेळी केले. ‘आम्ही ओबीसी समाजासोबतही बैठक घेतली. त्यांनाही आरक्षणाबाबत चिंता करू नका, असे सांगितले.
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचं गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आवाहन, व्हिडिओ पोस्ट करत म्हणाल्या…

‘गृहविभाग आपले काम करेल’

कायदा आणि सुव्यवस्था तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षाला शिंदे यांनी शायरीतून उत्तर दिले. ‘मुंह खोलने से पहले सोचना सीख लें, पहले तो अपने अंदर झाँक के देख लें!’, असे म्हणत तुम्ही लोक आधी तुमचे बघा आणि मग सरकारवर टीका करा, असे त्यांनी सुनावले. ‘खिचडी, बॉडीबॅग, प्राणवायू निर्मिती प्रकल्प आणि कोविडमध्ये माणसे मरत असताना काही नेते पैसे कमावत होते. हे पाप तुम्ही कुठे फेडणार? यामध्ये आम्ही कुठल्याही सूड भावनेने निर्णय घेणार नाही. पण जे सत्य आहे, ते जनतेसमोर आणण्याचे काम गृह विभाग करेल’, असे शिंदे यांनी बजावले.
लोक मरतायेत, त्यांची घरं पाण्यात बुडतायेत, आणि तुम्ही पाच वर्षे फाइलींवर बसता, उच्च न्यायालयाने झापले

चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

‘राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, आरोग्य विभागातील भ्रष्टाचार, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व अजूनही न मिळालेली भरपाई यांसारख्या मुद्द्यांवरून सरकारच्या गृह, आरोग्य आणि कृषी विभागाला लक्ष्य करण्यात येणार असल्याचे संकेत विरोधकांनी बुधवारी दिले. ‘तुमच्या चहापेक्षा आम्हाला शेतकऱ्यांचे अश्रू महत्त्वाचे आहेत’, असे सांगत हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानावर बहिष्कार टाकला आणि सरकारचा निषेध केला.
Weather Forecast : हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, पावसाच्या हजेरीनं उपराजधानीत परत एकदा ‘हिवसाळा’,थंडी वाढली
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed