राज्यात २०१९मध्ये सहा लाख २९ हजार ८५८ जणांना कुत्र्यांनी चावे घेतले होते. या वर्षी आठ जणांना त्यामुळे जीव गमावावा लागला. २०२०, २०२१मध्ये या संख्येमध्ये घट झालेली दिसते. मात्र २०२२मध्ये श्वानदंशामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या वाढून २९ इतकी झाली. २०२३मध्ये श्वानदंशामध्ये पुन्हा वेगाने वाढ झाली असून, ही संख्या पाच लाख ९६ हजार ४७२ इतकी नोंदवण्यात आली आहे.
पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक
महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांची श्वानदंशामुळे झालेल्या मृत्यूची संख्या अधिक आहे. या वर्षातील पहिल्या दहा महिन्यांमध्ये १९ जणांचा राज्यात श्वानदंशामुळे मृत्यू झाला आहे. त्यात १५ पुरुष, तर चार महिलांचा समावेश आहे. या महिला ७२ ते ८२ या वयोगटातील आहे. चार ते अठरा वयोगटातील सात मुलग्यांचा मृत्यू श्वानदंशामुळे झाला आहे. २०२२मध्ये श्वानदंशामुळे २९ मृत्यू झाले असून, त्यातील वीस मृत्यू हे पुरुषांचे, तर नऊ स्त्रियांचे मृत्यू आहेत. २०२१मध्ये ही संख्या १९, तर २०२०मध्ये २३, २०१९मध्ये दहा जणांचा प्राण गमवावे लागले आहे. २०१९, २०२० आणि २०२१मध्ये अनुक्रमे १४, १९ आणि आठ पुरुषांना श्वानदंशामुळे जीव गमावावा लागला आहे. त्यातुलनेत स्त्रियांची संख्या कमी आहे. दरम्यान, ‘महाराष्ट्र टाइम्स’ने रेबिज लशींच्या उपलब्धतेसंदर्भात आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता, या संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही
आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-पुण्यासारखी शहरे सोडली, तर इतर ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम यंत्रणा अद्याप उपलब्ध नाही. कुत्र्यांना पकडण्यापासून त्यांचे निर्बिजीकरण करण्यापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये मनुष्यबळाची उपलब्धता गरजेची आहे. ‘आशा’ संस्थेचे सदस्य व्ही.एस. मोने यांनी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा केवळ मुंबईचा राहिला नसून, तो राज्यातही भेडसावत आहे. प्रत्येक शहराच्या पालिका स्वतंत्र नियोजन करून निर्णय घेतात यावर संबधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्रित येऊन तोडगा काढायला हवा याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राज्याच्या आरोग्यसेवा आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार
वर्ष- १जानेवारी २०१९ ते २४ ऑक्टोबर २०२३- झालेले मृत्यू
वर्ष – श्वानदंश – मृत्यू
२०१९- ६,२९,८५८ -१०
२०२०- ३,२६,७४५ – २३
२०२१- ४,४७,६७४ – १९
२०२२- ५,७२,२१५- २९
२०२३(२४ ऑक्टो.पर्यंत)- ५,९६,४७२ – १९
एकूण – २५ लाख ७२ हजार ९६४ श्वानदंश
मृत्यू – १००