• Tue. Nov 26th, 2024

    साखर कारखान्यात फोमवर पाणी मारताना पाय घसरला, उकळत्या पाण्याच्या टाकीत पडून कामगारांचा मृत्यू

    साखर कारखान्यात फोमवर पाणी मारताना पाय घसरला, उकळत्या पाण्याच्या टाकीत पडून कामगारांचा मृत्यू

    म. टा. वृत्तसेवा दौंड: आलेगाव येथील दौंड शुगर प्रा. लि. या साखर कारखान्यात ‘बॉयलिंग हाउस’चे पाणी रिसायकल करण्याआठी तयार करण्यात आलेल्या टाकीत पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही दुर्घटना झाली. संदीप कुंडलिक गरदाडे (वय २३, रा. पेडगाव,ता. दौंड) आणि गणेश सिताराम शिंदे (वय २३, रा. शेडगाव पिसारे, ता. करमाळा) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. या दुर्घटनेबाबत फारुक दुगे यांनी दौंड पोलिस ठाण्यात खबर दिली असून, अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गरम पाण्याच्या टाकीमधील लाइनमध्ये संदीप हे फोमवर पाणी मारण्याचे काम करीत होते. या वेळी निसरड्या पृष्ठभागावरून गरम पाण्याच्या टाकीमध्ये पाय घसरून ते पडले. संदीप टाकीत पडलेले पाहून खलाशी म्हणून काम करीत असलेले गणेश हे त्यांना वाचविण्यासाठी गेले. मात्र, तेदेखील टाकीत घसरून पडले. उपस्थित कामगारांनी त्वरित वरिष्ठांना माहिती दिली. यानंतर दोघांना टाकीतून बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी दौंड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश राऊत करीत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed