राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज सातारा येथे शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.
अजितदादांना द्यायला काय कमी पडलो, त्यांनाच विचारा
आम्ही धर्मनिरपेक्ष विचारांचे पक्ष आहोत त्यामुळं अजित पवार कोणाला काय म्हणाले, या बाबत त्यांना विचारा. तसेच मी त्यांना काय काय द्यायला कमी पडलो ते तुम्ही त्यानांच विचारा, असेही पवार म्हणाले.
भिजल्यानंतर लोकं काय करतात ते पाहिलंय
सातारा जिल्ह्यातील सातारा लोकसभा मतदारसंघ, वाई व फलटण विधानसभा निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यावर शरद पवार म्हणाले, साताऱ्यातील सभेत पावसात भिजलो. त्यानंतर लोकं काय करतात ते सर्वांनी पाहिलंय. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार देणार आणि निवडून आणणार, असे ठामपणे सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे
आम्हा सगळ्यांची मागणी आहे, की संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर ज्या समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्यांची स्पष्टता येईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यात मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे; परंतु, त्यासोबत इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, अशी आमची भूमिका आहे. इतरांच्या ताटातल काढून न घेता मराठा समाजाला न्याय द्यावा. अधिवेशनात आरक्षणावर काय चर्चा होईल यावर आमचं लक्ष असेल, असे पवार यांनी शेवटी म्हटले.
दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघात आता शरद पवार समर्थक उमेदवार आणि अजित पवार समर्थक उमेदवार आमने सामने पाहायला मिळतील.
Read Latest Maharashtra News And Marathi News