• Sun. Mar 15th, 2026
    Pune Crime : नागेश जाधव हत्या प्रकरणात 6 जणांना अटक, 5 महिलांचा समावेश; 4 जणांचा शोध सुरु, पोलिसांची माहिती

    कोथरूडमधील मेगासिटी परिसरात २३ वर्षीय नागेश जाधवच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी ५ महिलांसह ६ जणांना अटक करण्यात आली असून अन्य ४ जणांचा शोध सुरू आहे.

    पुण्यात मेत्रीच्या वादातून तरुणाची हत्या, ६ आरोपी ताब्यात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात मैत्रीच्या नात्यावरून संतापलेल्या कुटुंबीयांनी २३ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या नागेश जाधव याला इमारतीच्या टेरेसवर नेऊन लाकडी दांडक्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान ससून रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सहा आरोपींना अटक झाली असून चौघांचा शोध सुरू आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, नागेश संजय जाधव (वय 23, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) हा तरुण शनिवारी (14 मार्च) सायंकाळी आपल्या मैत्रीणीला भेटण्यासाठी कोथरूडमधील मेगासिटी परिसरात गेला होता. दोघांमध्ये मैत्री असल्यामुळे ते फोनवर बोलत असत. मात्र मुलीला वारंवार का भेटतो, या कारणावरून मुलीच्या कुटुंबीयांना संताप आला. सायंकाळी सुमारे आठच्या सुमारास नागेशला इमारतीच्या टेरेसवर नेण्यात आले. तेथे काही महिला व पुरुषांनी मिळून त्याला लाकडी दांडक्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत नागेश खाली पडलेला असताना त्याच्या कुटुंबीयांना फोन करून “तुमचा मुलगा मेगासिटी येथे आहे, दहा मिनिटांत येऊन घेऊन जा, नाहीतर खाली फेकून देऊ,” अशी धमकी देण्यात आली होती.

    Maharashtra TimesPune Crime : ‘आम्ही त्याला मारलं आहे’; अल्पवयीन मुलीशी मैत्रीचा राग, तरुणाला मारहाण करताना मृत्यू, आईला व्हिडिओ कॉलवर भयावह दृश्य दाखवलं

    ससून रुग्णालयात तरुणाचा मृत्यू..

    घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागेशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना ससून रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी नागेशची आई सुरेखा जाधव यांच्या फिर्यादीवरून दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

    पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये पाच महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे.

    Maharashtra TimesDhanashree Jagtap Case : धनश्री जगताप मृत्यू प्रकरणात पोलिसांवर आरोप; 10 दिवस उलटूनही सासू-सासरे फरार

    पोस्टमार्टम अहवालानंतर अधिक माहिती स्पष्ट होईल,” असे त्यांनी सांगितले. कोथरूड पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा