Pune Crime News : लोणीकंदमधील बकोरी रोड परिसरात २२ वर्षीय वैष्णवी लाटे या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पैशांसाठी छळ केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीच्या आईने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. लग्नानंतर काही दिवस सर्व काही ठीक होते. मात्र त्यानंतर पती आणि सासरच्या मंडळींकडून तिला वारंवार पैशांसाठी त्रास दिला जात होता. पती यशवंत लाटे हा वारंवार शिवीगाळ करत मारहाण करत होता आणि माहेरून पैसे आणण्याचा दबाव टाकत होता, असा आरोप करण्यात आला आहे.
पैशांसाठी छळाचा आरोप
याशिवाय सासू, सासरा आणि दिर यांनी देखील पैशांसाठी तगादा लावत तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. सततच्या या त्रासामुळे वैष्णवी प्रचंड मानसिक तणावाखाली होती, असेही सांगितले जात आहे.
Pune Crime : नागेश जाधव हत्या प्रकरणात 6 जणांना अटक, 5 महिलांचा समावेश; 4 जणांचा शोध सुरु, पोलिसांची माहिती
राहत्या घरात गळफास
अखेर या सगळ्या छळाला कंटाळून १४ मार्च रोजी सकाळच्या सुमारास वैष्णवीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. ही घटना उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात पतीसह सासू, सासरा आणि दिर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे पुन्हा एकदा विवाहित महिलांवरील छळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सासरच्या छळाला कंटाळून अजून किती वैष्णवींना आपला जीव गमवावा लागणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
