• Mon. Nov 25th, 2024
    भाजपची ३ राज्यांत दणदणीत विजयाकडे वाटचाल, काँग्रेसच्या EVM विजय आरोपावर शरद पवार म्हणाले…

    सातारा : लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. दुपारपर्यंतच्या कलानुसार चार राज्यांपैकी भाजपने तीन राज्यांत जोरदार मुसंडी मारली आहे. मध्य प्रदेशची सत्ता राखताना राजस्थान आणि छत्तीसगडची सत्ता काँग्रेसच्या हातून हिसकावून घेण्यात भाजपला यश आलेलं आहे. मात्र भाजपचं यश काँग्रेसला बोचलं असून हा विजय ईव्हीएमचा विजय असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. याचविषयी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी सावध पवित्रा घेतला.

    शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. ४ राज्यांच्या निवडणूक निकालांसंबंधी शरद पवार यांना बोलतं करण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला. यावेळी ते म्हणाले, ४ राज्यांपैकी ३ राज्यांच्या निवडणुकीत भाजपला अनुकूल निकाल दिसतोय. संध्याकाळपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल. पण सध्या इंडिया आघाडीसमोर मोदींना कोण पर्याय असेल, हाच विषय आमच्यासमोर आहे, असं सांगतानाच या निवडणुकीचा लोकसभेच्या निकालांवर काहीही परिणाम होणार नाही, असं सांगायला शरद पवार विसरले नाहीत.

    “राजस्थानमध्ये पाच वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. तिथे नवीन लोकांना सत्ता द्यावी, असा जनतेचा मूड होता. दुसरीकडे तेलंगणात सत्ताधाऱ्यांना साजेशाच मूड असतो, असं नेहमी दिसतं. पण यंदा राहुल गांधी यांची हैदरबादमध्ये सभा झाली, तिथला गर्दीचा उच्चांक बघून आम्हा लोकांची खात्री झाली की यंदा तेलंगणात सत्ताबदल होईल, असा आवर्जून उल्लेख शरद पवार यांनी केला. त्याचवेळी ३ राज्यांच्या निवडणुकीत भाजपला अनुकूल निकाल दिसत असल्याचं पवार म्हणाले.

    भाजपच्या विजयानंतर काँग्रेसने ईव्हीएमचा विजय असल्याचा आरोप केला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “याबाबतची माहिती माझ्याकडे नाही. खरी माहिती मिळेपर्यंत ईव्हीएमला दोष देणार नाही”. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे असा निकाल लागला आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले, “खरं सांगायचं तर निवडणूक झालेल्या एकाही राज्यामध्ये मी गेलेलो नाही. त्यामुळे मला माहिती नाही”.

    “चार राज्यांच्या निकालाचा इंडिया आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही. कारण विधानसभा आणि लोकसभेचा जनतेचा मूड वेगळा असतो. निकालानंतर उद्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या घरी आम्ही इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. त्याठिकाणी आम्ही या सगळ्या गोष्टींचं परिमार्जन करू”, असंही शरद पवार सांगितलं.

    मोदींची जादू आणखी आहे, असं म्हणायचं का? असा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर शरद पवार यांनी मोठ्या खुबीने उत्तर दिलं. ते म्हणाले, मतमोजणी आणखी सुरू आहे. संध्याकाळी ६ वाजताच्या पुढे सांगता येईल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *