• Sun. Sep 22nd, 2024

नवीन पक्ष का नाही काढला? आव्हाडांचा हल्लाबोल, मुश्रीफांकडून जोरदार प्रत्युत्तर

नवीन पक्ष का नाही काढला? आव्हाडांचा हल्लाबोल, मुश्रीफांकडून जोरदार प्रत्युत्तर

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अनेक गौफ्यस्फोट केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोघांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. काल बोलताना अनिल देशमुख देखील आपल्यासोबत येणार होते. मात्र ऐनवेळी त्यांनी नकार दिल्याचं अजित पवार म्हणाले होते. याला आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील दुजोरा देत भाष्य केलं आहे. काल अजित पवार यांनी जे काही सांगितलं ते वस्तुस्थितीला धरून आहे. अनिल देशमुख आमच्यासोबत येणार होते. पण नंतर त्यांनी नकार दिला. त्यांनी इतकं खोटं बोलू नये. अजित दादांना सुपारी द्यायचा प्रश्न येत नाही. प्रफुल्ल पटेल यांनी यावर सविस्तर सांगितलं आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले. त्याचवेळी ज्या पक्षात इतकी वर्ष काम केलं तो पक्ष सोडून दुसरा पक्ष कसा काढणार? असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिलं

पक्षात इतकी वर्ष काम केलं तो पक्ष सोडून दुसरा पक्ष कसा काढणार?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर दोन्ही गटांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काल अजित पवार गटाच्या चिंतन बैठकीत अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर टीका करत गौप्यस्फोट केले. यानंतर शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर मिळत आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला एक नवीन पक्ष काढा, नवीन निशाणी घ्या आणि स्वत:च कर्तृत्व सिद्ध करुन दाखवा असं आव्हान दिलं. त्यावर मुश्रीफांनी प्रतिक्रिया देत ज्या पक्षात इतकी वर्ष काम केलं तो पक्ष सोडून दुसरा पक्ष कसा काढणार? जो पक्ष कष्ट करून वाढवला त्याबद्दल वेगळ्या भावना असतात, असं हसन मुश्रीफ म्हणाले. तसेच सध्या राष्ट्रवादीचे जिथे जिथे आमचे खासदार आहेत, त्या जागा आम्हीच लढवणार आहोत. त्यात बारामतीसुद्धा आहे. त्यामुळे पवार कुटुंबामध्ये गृहकलहाचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही मुश्रीफ म्हणाले.

आम्ही एक राजकीय भूमिका घेतली आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही प्रामाणिक

जागांसंदर्भात अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्रित बसून यावर निर्णय घेतील. प्रफुल्ल पटेल यांनी २००४ पासूनचा घटनाक्रम सांगितला आहे. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करायची आवश्यकता नाही. पण यावरून अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीसाठी चर्चा, प्रयत्न सुरू होते, हे दिसून येते. आम्ही एक राजकीय भूमिका आता घेतली आहे आणि त्या भूमिकेशी आम्हाला प्रामाणिक राहावे लागेल. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करून ते सिद्ध करावे लागेल. अन्य राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल काही लागले तरी लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार नाही, असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed