शरदचंद्र सिन्हा यांच्यासारखा काँग्रेसमधील वरिष्ठ नेता शरद पवारांसोबत उभा राहिला होता. केरळमध्ये पक्षाचे लोकप्रतिनिधी होते, या पक्षाला राष्ट्रीय नेतृत्त्व कुणामुळं मिळालं होतं, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला केला.
तुम्हाला ५ जुलैच्या सभेत शरद पवारांचा फोटो कशासाठी वापरावा वाटला. कालपर्यंत तुम्ही शरद पवार आमचे दैवत आहेत, असं म्हणायचा आणि आज शरद पवारांवर एवढ्या गोळ्या घालण्याचं कारण काय? आणि कुणी गोळ्या झाडाव्यात, असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना विचारला आहे.
शरद पवारांना संपवण्याची सुपारी त्यांनी घेतली आहे. कारण ते काय जादूगार आहेत हे त्यांना ते माहिती आहे. त्यामुळं १९९३ साली शरद पवार काय म्हणाले होते, १९९६ साली शरद पवार काय म्हणाले होते हे कशासाठी काढत आहात, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देत जितेंद्र आव्हाड यांनी माझी आणि जयंत पाटलांची बैठक झाली नव्हती, कुठं झाली होती, काय पुरावे आहेत? असा प्रतिप्रश्न केला. मी तुमचा पुरावा देतो, तुम्ही कुठल्या फ्लाइटनं कधी दिल्लीला गेलात, त्या फ्लाइटचा व्हीटी नंबर सगळं देतो. रात्रीच्या अंधारातच तुम्हाला कशाला दिल्लीला जायचं होतं, असा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला.
शरद पवारांभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय, यांनी शरद पवारांवर टीका केली नसती तर त्यांची भाषण राज्यभरात गेली असती का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. शरद पवारांवर तुटून पडणार असाल तर आम्ही देखील योद्ध्याप्रमाणं लढू, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News