उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. रायगड येथील एका भाषणात कार्यकर्त्यांना सूचना देताना लोकसभा निवडणूक येणाऱ्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागतील अशी शक्यता बोलून दाखवली आहे. सोबतच कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना ही दिल्या आहेत. अजित पवार यांनी चार जागांवर आपला दावा केला आहे. त्यामधील शिरूर लोकसभा मतदारसंघाचा ही समावेश आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचे चार आमदार ठाण मांडून आहेत.
वळसे पाटील – आंबेगाव – शिरुर विधानसभा मतदार संघ
अतुल बेनके – जुन्नर विधानसभा
दिलीप मोहिते – खेड – आळंदी विधानसभा
अशोक पवार – शिरुर – हवेली विधानसभा
चेतन तुपे – हडपसर विधानसभा
यामधील अशोक पवार आणि चेतन तुपे हे तटस्थ आहेत पण अजित पवारांच्या कार्यक्रमात अनेकदा त्यांची उपस्थिती पाहण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुका लागल्या तर शिरूर मतदारसंघासाठी अजित पवार यांचे वर्चस्व असणार आहे.
शिवाजी आढळराव पाटील यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार दिलीप वळसे पाटील सोबत संबंध अधिक घट्ट झाल्याचं चित्र अनेक कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. आंबेगाव तालुक्यातील अनेक लग्न कार्यक्रम आणि किंवा स्थानिक कार्यक्रमांमध्ये दोघांचे एकत्र हजेरी असल्याचा पाहायला मिळते. दोघांचे संबंध हे घट्ट झाल्याने शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच टेन्शन वाढलं आहे. अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचे शिरूर लोकसभेचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांना शह देण्यासाठी अजित पवारांकडून शिवाजी आढळराव पाटील यांना आपल्या पक्षात घेतले जाऊ शकते. याबाबत शिवाजी आढळराव पाटील यांना विचारला असता ते म्हणाले की अशी केवळ शक्यता आहे. पण पाहायला गेले तर अजित पवार यांचा या जागेवर मूळ हक्क आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हा एकच पक्ष आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यानुसार आम्ही काम करू, असे आढळराव पाटील यांनी म्हटले.
