• Mon. Nov 25th, 2024
    अवकाळीचा मसाला बाजारालाही फटका; लाल मिरचीचे नुकसान, टंचाई भासून दर वाढण्याची शक्यता

    नवी मुंबई: या आठवड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहेच. परंतु याचा विपरित परिणाम शहरी जनजीवनावरही होणार आहे. या पावसाने मसाल्यासाठी लागणाऱ्या लाल मिरचीचेही मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे बाजारात येण्यासाठी सज्ज आणि रोपांवर तयार असलेली लाल मिरची पाण्याखाली गेली आहे.
    अवकाळीचा पिकांना तडाखा; शेतकरी संकटात, राज्यात एकत्रित पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
    परिणामी, मुंबईच्या बाजारात येण्यासाठी सज्ज असलेल्या लाल मिरचीचे आगमन आता लांबणीवर पडले आहे. त्यामुळे घरोघरी वर्षभरासाठी मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या लाल मिरचीची टंचाई भासून त्यांचे दर वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वाशीतील घाऊक मसाला बाजारात दिवाळीनंतर मसाल्याच्या मिरचीची आवक सुरू होते. दररोज दोन-चार गाड्यांपासून सुरू झालेली आवक फेब्रुवारी ते मेपर्यंत १०० गाड्यांवर पोहोचते. मसाला बाजारात महाराष्ट्रातील नंदुरबारसह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात आवक होते. यासाठी येथे मोठ्या प्रमाणात मिरची साठवून ठेवली जाते.

    मात्र या सर्व ठिकाणी मोठा पाऊस झाल्यामुळे येथील मिरची पूर्णपणे भिजली आहे. मिरचीचे आगर समजल्या जाणाऱ्या नंदुरबारमधून मसाल्यासाठी लागणारी मिरची मोठ्या प्रमाणात येत असते. मात्र या सर्व ठिकाणी आलेल्या अवकाळी पावसाने ही लाल मिरची भिजवली आहे. त्यामुळे मिरचीचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारात असलेल्या ३० हजार क्विंटलहून अधिक मिरचीचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. हे फार मोठे नुकसान असल्याने मुंबईसारख्या बाजारात मसाल्याच्या हंगामात मिरचीची टंचाई भासण्याची शक्यता आहे.

    नुकसान झालं तरी चालेल तुम्ही गावात येऊ नका, मराठा बांधवांचा छगन भुजबळांना विरोध

    आताच्या पावसाने मोठे नुकसान केले असताना आता शेजारील दक्षिणेकडील राज्यातही वादळाचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे आता उरलेल्या मिरचीच्या पिकावरही संकट ओढवले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान या अवकाळी पावसाने जिथे जिथे मसाल्याच्या मिरचीचे उत्पादन होते, तिथे तिथे हजेरी लावून मिरचीचे मोठे नुकसान केले आहे. याचा मोठा परिणाम यंदाच्या वर्षी मुंबई बाजारात येणाऱ्या मिरचीच्या आवकेवर दिसणार आहे. आवक कमी झाल्यास दरही चढेच राहतील, असे मिरचीचे घाऊक व्यापारी अमरीश बारोट यांनी सांगितलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *