राष्ट्रपती काही महिन्यांपूर्वी शिर्डीला आल्या होत्या. त्यावेळी त्यांचा शनिशिंगणापूर दौरा होऊ शकला नाही. त्यामुळे त्या आता पुन्हा नगरच्या दौऱ्यावर येत आहेत. यामध्ये केवळ शनिशिंगणापूर येथे दर्शन एवढाच कार्यक्रम असून अन्य कोणताही कार्यक्रम नाही. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास राष्ट्रपतींचे शनिशिंगणापूरमध्ये हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. त्यानंतर सभामंडपात अभिषेक, चौथऱ्यावर जाऊन शनीदेवाला तेलाचे अभिषेक, देवस्थान विश्वस्त मंडळाकडून सत्कार आणि त्यानंतर राष्ट्रपती महाप्रसादाचा आस्वाद घेणार आहेत.
शनिशिंगणापूर येथील चौथरा मधल्या काळात खूप गाजला. या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास महिलांना बंदी होती. २०१५ च्या सुमारास महिला संघटनांनी या विषयी आवाज उठवला. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी यासाठी आंदोलनही केले. गावातून आणि अन्य ठिकाणाहूनत्या त्यांना विरोध झाला. अखेर ही बंदी मोडून चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास महिला आंदोलकांना यश आले. त्यानंतर येथे बंदी नसून चौथरा सर्वांसाठी खुला असल्याचे देवस्थानतर्फे जाहीर करण्यात आले. या काळात देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी महिला सदस्याची निवड झाली होती. पुढे सुरक्षेच्या कारणासाठी चौथऱ्यावर जाण्यास सर्वांनाच बंदी करण्यात आली होती.
अशा विविध कारणांमुळे चौथऱ्याचा विषय गाजला होता. चौथरा खुला असला तरी अनेक महिलांनी वर जाऊन दर्शन घेणे टाळल्याचे दिसून येते, तर काही महिला चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतात. आता देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या द्रौपदी मुर्मू शनि शिंगणापूरला येत आहेत. त्याही चौथऱ्यावर जाऊन शनीदेवाला तेलाचा अभिषेक घालणार आहेत. चौथऱ्यासमोरच त्यांचा देवस्थानतर्फे सत्कारही करण्यात येणार आहे.