पोलिसांचा खडा पहारा; अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी
राजू शेट्टी यांच्या गेल्या चार तासापासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन स्थळी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने सुमारे अडीचशे पोलीस कर्मचाऱ्यांसह २८ अधिकारी येथे तैनात करण्यात आले आहे. तर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही गोकुळ शिरगाव मार्गे वळवण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने आणि बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत असून अनेक नागरिक पाच ते सहा किलोमीटर चालत जात आहेत. तर वठार, शियेफाटा ,कसबा बावडा येथे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
स्वाभिमानीच्या शिलेदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अल्टिमेटम दिल्यानंतरही कारखानदारांनी मागील हंगामातील पैसे न देण्यावर ठाम भूमिका घेतल्याने अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटना आज रस्त्यावर उतरून शिरोली येथे महामार्ग रोखण्यावर ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत आता तडजोड नाही, अशीच भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली असताना, पोलीस प्रशासनाने मध्यरात्री स्वाभिमानीच्या शिरोळ आणि जयसिंगपूर मधील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन शिंदे यांना आज पहाटे शिरोळ पोलिसांनी अटक केली आहे. आजचे चक्का जाम आंदोलन चिरडण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. तर सकाळपासून पालकमंत्री आणि राजू शेट्टी यांच्या फोन द्वारे चर्चा सुरू असून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.