• Mon. Nov 25th, 2024

    कामगार कल्याण विभागाच्या योजनांच्या लाभामुळे शैक्षणिक स्वप्नपूर्ती

    ByMH LIVE NEWS

    Nov 23, 2023
    कामगार कल्याण विभागाच्या योजनांच्या लाभामुळे शैक्षणिक स्वप्नपूर्ती

    कामगार कल्याण विभागांतर्गत बांधकाम कामगारांसाठी अनेकविध लाभाच्या योजना कार्यान्वित आहेत. त्याचा लाभ अनेक कामगार घेताना दिसत आहेत. त्यापैकीच एक दत्तात्रय मेंडुगले. सांगलीत राहणारे श्री. मेंडुगले हे जवळपास 15 वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात वायरिंगचे काम करतात. त्यांना दोन अपत्ये असून अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या मुलाला दोन वेळा प्रत्येकी 60 हजार रूपये तर मुलीला 10 हजार रूपयांचा शैक्षणिक लाभ मिळाला आहे.

    श्री. मेंडुगले यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांच्या कुटुंबात त्यांच्यासह आई – वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी हे सदस्य आहेत. इलेक्ट्रिशियन बंधुंचे सहाय्यक म्हणून काम करताना दत्तात्रय यांनाही हे काम आवडू लागले. त्यांनी जेव्हा हे काम सुरू केले, त्यानंतर तत्कालिन बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेतल्यामुळे त्यांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यात आली. बांधकाम व्यावसायिकाकडे काम व अन्य घरगुती कामांतून त्यांना महिन्याला साधारण 20 ते 25 हजार रूपयांची आर्थिक प्राप्ती होते. पत्नी शिलाई काम करून संसाराला थोडा फार हातभार लावते.

    श्री. मेंडुगले यांनी त्यांच्या मुलाला याच क्षेत्रातील उच्च शिक्षण देण्याचे ठरविले. मुलगा सुदर्शननेही त्याला होकार दर्शवला. मुलानेही त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यास करून डी. के. टी. ई. इचलकरंजी संस्थेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग शाखेला प्रवेश मिळवला. पण, जेमतेम आर्थिक प्राप्तीमध्ये मुलांना उच्च शिक्षण देताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागायची.

    दरम्यान, बांधकाम कामगार कार्डच्या नूतनीकरणवेळी कामगार कल्याण व इमारत व अन्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कल्याणकारी योजनांबद्दल त्यांना माहिती मिळाली. त्यांनी अर्ज केल्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रू. 60,000 अंतर्गत त्यांच्या मुलाला दोन वर्षे लाभ मिळाला. तसेच, नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना इयत्ता 11 वी व 12 वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रू. 10,000 या अंतर्गत बारावी सायन्समध्ये  शिकणाऱ्या श्रेया या त्यांच्या मुलीला लाभ मिळाला. यामुळे मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होत असताना श्री. मेंडुगले मनापासून कामगार कल्याण विभागाचे आभार मानतात.

    याचबरोबर मुले लहान असताना शैक्षणिक साहित्य तसेच शिष्यवृत्तीचा लाभही मिळाला आहे. तसेच, त्यांनाही सेफ्टी जॅकेट, साहित्य ठेवण्यासाठी पेटी असा लाभ मिळाला आहे. एकूणच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून श्री. मेंडुगले यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बाबींचा प्रवेश झाला. त्यामुळे स्थैर्य प्राप्ती आली.

    000000

    (संकलन – संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली)

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed