• Sat. Sep 21st, 2024
विशेष लेख_योजना ‘सारथी’च्या….

राज्यातील मराठाकुणबीमराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिकशैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. शाहू विचारांना देऊया गतीसाधूया सर्वांगीण प्रगती’ हे ब्रीद घेवून काम करणाऱ्या सारथी’ संस्थेमार्फत विविध कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्याचे काम केले जात असून या योजनांच्या माहितीवर आधारित क्रमशः लेखमालेचा हा चौथा भाग…

महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट किंवा राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. सेट किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना पीएच.डी. प्रवेश परीक्षेतून सूट देण्यात येते. या परीक्षांचे महत्व लक्षात घेवून ‘सारथी’मार्फत राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गातील लक्षित गटातील उमेदवारांना सेट, नेट स्पर्धा परीक्षापूर्व निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येत आहे.

सेट स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी दरवर्षी एक हजार उमेदवारांची निवड करण्यात येते, तसेच नेट स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठीही दरवर्षी एक हजार उमेदवारांची निवड करण्यात येते. या प्रशिक्षणाचा कालावधीत 4 महिन्यांचा असून विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणासोबत दरमहा 8 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण शुल्क हे सारथी संस्थेमार्फत पॅनेलवरील प्रशिक्षण संस्थेस अदा करण्यात येते. सद्यस्थितीत पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथील सारथी संस्थेच्या पॅनेलवरील प्रशिक्षण संस्थेमार्फत सेट स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण देण्यात येते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा. त्याच्याकडे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्र रहिवाशी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीचा दाखला असावा. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक असावा तसेच सेट, नेट परीक्षा देण्यासाठी पात्र असावा. त्याच्याकडे शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबंधित तहसीलदार अथवा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र किंवा ईडब्लूएस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांकडून जाहिरातीद्वारे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.

प्रशिक्षणासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची संधी

सन 2023-24 मध्ये ‘सारथी’च्या सेट, नेट स्पर्धा परीक्षापूर्व निःशुल्क प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. https://sarthi-maharashtragov.in/  या संकेतस्थळावर 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. या संकेतस्थळावर योजनेच्या अटी, शर्ती आणि पात्रता निकषांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

तानाजी घोलप, माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed