• Mon. Nov 25th, 2024

    यंदा कोट्यवधींच्या लगीनगाठी! दागिन्यांसह भेटवस्तू खरेदीची लयलूट, मुंबईत ४ लाख विवाह होण्याचा अंदाज

    यंदा कोट्यवधींच्या लगीनगाठी! दागिन्यांसह भेटवस्तू खरेदीची लयलूट, मुंबईत ४ लाख विवाह होण्याचा अंदाज

    मुंबई : दिवाळी सरल्यानंतर दरवर्षी मुहूर्तानुसार विवाहसोहळ्यांचे आयोजन होते. यंदा २४ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह, देव दिवाळीपासून विवाह मुहूर्तावर अनेक लगीनगाठी बांधल्या जाणार असून यामुळे कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईत जवळपास ४ लाख विवाह होण्याचा अंदाज मांडला जात असून या माध्यमातून तब्बल १ लाख कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होणार आहे.

    तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा काळ सुरू होतो. यामध्ये यंदा देशभरात ३८ लाख विवाह होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या ३८ लाख विवाहसोहळ्यांमुळे देशभरात सुमारे पाच ते चार लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता होत आहे. देशभरातील एकूण विवाहसोहळ्यांपैकी जवळपास १० टक्के म्हणजेच चार लाख विवाह मुंबई शहर आणि उपनगर परिसरांत होणार आहेत. त्यानुसार पुढील काही महिन्यांत शहरांत विविध क्षेत्रांत सुमारे प्रचंड उलाढाल होण्याची शक्यता आहे. विवाहाच्या अनुषंगाने एकूण उलाढालीच्या २० टक्के खरेदी-विक्री मुंबईत होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

    अ. भा. खाद्यतेल असोसिएशनचे अध्यक्ष व अ.भा. व्यापारी महासंघाचे (कॅट) राज्य सचिव शंकर ठक्कर यांनी सांगितले की, ‘देशभरातील विवाहासाठी लागणारी बहुतांश खरेदी ही मुंबईत होते. त्यामार्फत होणारी ४० ते ५० टक्के उलाढाल किरकोळ व ५० ते ६० टक्के उलाढाल घाऊक बाजारात होते. संपूर्ण देशाला विवाहासाठी लागणाऱ्या सोने-चांदीचा पुरवठा मुंबईतूनच होतो. त्याखेरीज कापड खरेदीही मोठ्या प्रमाणात मुंबईतून होते. त्यामुळेच देशभरात होणाऱ्या एकूण ४.७५ लाख कोटी रुपयांच्या उलाढालीपैकी २० टक्के खरेदी-विक्री मुंबईत होण्याची चिन्हे आहेत.’ ठक्कर यांच्यानुसार, यंदाच्या या विवाह मोसमात १ लाख व ५० हजार रुपये खर्चाचे प्रत्येकी ७ लाख विवाह देशात होऊ घातले आहेत. तर ३ लाख रुपये खर्चाचे ७ लाख, ८ लाख रुपये खर्चाचे ६ लाख, १० लाख रुपये खर्चाचे १० लाख, १५ लाख रुपये खर्चाचे ७ लाख व २५ लाख रुपये खर्चाचे ५ लाख विवाह होत आहेत.
    तुळशी विवाहानंतर आता ‘लगीनघाई’, यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी शुभ मुहूर्त कोणते? जाणून घ्या तारखा
    … अशी होते खरेदी

    ‘कॅट’च्या निरीक्षणानुसार, लग्न समारंभासाठी सहसा ५० टक्के खर्च हा सामान खरेदी व ५० टक्के सेवांसाठी खर्च होतो. त्यानुसार जंदा कपडे, साड्या व अन्य सामानांवर १० टक्के, दागिने खरेदीवर १५ टक्के, विद्युत उपकरणांवर पाच टक्के, मिठाईवर पाच टक्के, भेटवस्तूंवर पाच टक्के, धान्य-किराणा सामानावर पाच टक्के खर्च होण्याची चिन्हे आहेत. कपडे व दागिन्यांची बहुतांश खरेदी ही मुंबईतच होईल.

    खर्चानुसार लग्नसोहळ्यांची अंदाजित संख्या

    -किमान पन्नास हजार ते लाख रुपये खर्च – ७ लाख लग्नगाठी बांधल्या जाण्याची शक्यता
    – ३ लाख रुपये खर्च- ७ लाख विवाह सोहळ्यांची शक्यता
    – ८ लाख रुपये खर्च- ६ लाख विवाह सोहळ्यांचा अंदाज
    – १० लाख रुपये खर्च- १० लाख विवाह सोहळ्यांची शक्यता
    – १५ लाख रुपये खर्च- ७ लाख विवाहांच्या आयोजनाची शक्यता
    -२५ लाख रुपये खर्च- ५ लाख विवाह होण्याची शक्यता

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed